नवी दिल्ली : जून महिन्यापासून अनेक नवीन नियम नागरिकांवर थोपवले जातात. काही नियमांची जनतेला माहिती नसते त्यामुळे प्रत्यक्षात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कडाक्याच्या उन्हात जून महिन्यात बँक सुट्ट्या, आधार कार्ड अपडेट आणि ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊया १ जूनपासून कोणते नियम बदलणार आहेत?
एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम पदार्थांत वाढ नाही
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर आणि इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नव्याने ठरवल्या जातात. महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री पेट्रोलियम कंपन्या याची घोषणा करतात. अशा परिस्थितीत १ जून रोजी पेट्रोलियम कंपन्या एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल, करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना थोडासा आधार मिळाला आहे. यापूर्वी मे महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती.
ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे
आजपासून म्हणजेच १ जूनपासून नवीन वाहतुकीचे नियम लागू होणार आहेत. आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्येच परीक्षा देणे बंधनकारक राहणार नाही. अशा स्थितीत ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे. १ जूनपासून तुम्ही सरकार मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्येही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शारीरिक त्रासापासून सुटका होणार आहे.
वाहतुकीच्या दंडात वाढ
नवीन वाहतूक नियमांनुसार वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. १८ वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालवल्यास किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास २५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द तर होईलच पण २५ वर्षांसाठी नवीन परवानाही दिला जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १००० ते २००० रुपये, विना परवाना वाहन चालवल्यास ५०० रुपये, हेल्मेट न घातल्यास १०० रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आधार कार्ड अपडेट करणे १४ जूनपर्यंत मोफत
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI च्या मते, जर तुम्ही तुमचे आधार कार्ड १० वर्षांपासून अपडेट केले नसेल तर तुम्ही १४ जूनपर्यंत ते मोफत करू शकता. आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया UIDAI पोर्टलवर १४ जून २०२४ पर्यंत मोफत आहे. जर तुम्ही १४ जून नंतर तुमचे आधार कार्ड अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल. तुम्ही घरी बसून किंवा आधार कार्ड केंद्राला भेट देऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर गेल्यास तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचवेळी, सध्या UIDAI पोर्टलवर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
जून महिन्यात बँक १२ दिवस बंद
जून महिन्यात बकरीद, वट सावित्री व्रत यासह विविध सणांच्या निमित्ताने सार्वजनिक व साप्ताहिक सुटी असल्याने अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये एकूण १२ दिवस बँक शाखा बंद राहतील. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानामुळे पहिल्या जून रोजी अनेक राज्यांतील काही भागात बँक शाखा बंद राहतील. बँकेच्या शाखा बंद असताना तुम्ही बँकेत जाऊन कोणत्याही सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत बँकेच्या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित कामाचे नियोजन केले तर बरे होईल. तथापि, येथे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या दिवशी बँकांच्या शाखा बंद राहतील त्या दिवशीही बँकांच्या ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
पॅन कार्ड आधारशी जोडणे बंधनकारक
आयकर विभागाने नुकत्याच केलेल्या अधिसूचनेत करदात्यांना ३१ मे पर्यंत त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे १ जूनपासून सामान्य दराच्या दुप्पट दराने टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स (टीडीएस) कपात करणे बंधनकारक करण्यात आले आहे.