अलिबाग, (धनंजय कवठेकर): सक्षम एज्युकेशन सोसायटी मार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम वर्षभर हाती घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून चोंढी अंगणवाडी शाळेमध्ये परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात आला.
इंजिनीरिंगचे शिक्षण घेत असलेला परहूर पाडा येथील गुणवंत विद्यार्थी सन्मेष घरत याला परेश सुर्वे आणि सचिन शिंदे यांच्या आर्थिक मदतीतून, झिराडमधील प्रतिभावान विद्यार्थी अनुष्का पवारला मुंबई येथील योगेश गावडे यांच्या आर्थिक मदतीतून तसेच अलिबाग येथील गुणवंत विद्यार्थिनी मनस्वी गव्हाणकर हिला अमेरिका येथे स्थायिक असलेले शिल्पा दहात, नागसेन दहात आणि किहीम ग्रुप ग्रामपंचायत सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या आर्थिक सहभागातून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनमी सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड, किसन गायकवाड - मराठा समाज सचिव, प्रीती गायकवाड - पोलीस पाटील, निवेदिता भोईर - अंगणवाडी मुख्य सेविका, सोनाली आमले - अंगणवाडी मदतनिस, आशासेविका श्रद्धा कीर, तसेच सक्षम मार्फत अध्यक्ष शार्दुल काठे, खजिनदार योगेश पवार, सदस्य - विशाल आमले, वासुदेव आमले, ओमकार आमले, परेश सुर्वे, सचिन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित पालकवर्गाशी संवांद साधताना सरपंच प्रसाद गायकवाड यांनी शिक्षणाचे महत्व आणि सक्षम एज्युकेशन सोसायटी करत असलेल्या कार्याचा गौरव केला व भविष्यातील सक्षमच्या कार्यक्रमासाठी २५,०००/- रुपये मदतीची घोषणा केली. सरतेशेवटी सर्व उपस्थित मान्यवर व चोंढी अंगणवाडी मुख्यसेविका निवेदिता भोईर यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे शार्दूल काठे यांनी आभार मानले.