महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे निर्देश
कल्याण: कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या गरजेच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, प्रामुख्याने शहरातील वाहतुककोंडी कमी करणे व आगामी काळात साजरे होणारे श्री सार्वजनिक गणेशोत्सव व इतर धार्मिक सणांच्या वेळी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या कार्यवाही संदर्भात गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी वरील निर्देश दिले.
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी महापालिका क्षेत्रात अवैध रिक्षा स्टँडबाबत पुढच्या सप्ताहात सर्व्हे करून नंतर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी संबंधित अधिका-यांना दिले. शिळफाटा रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महापालिका अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अनधिकृत होर्डिग्ज, अतिक्रमणे त्वरीत काढण्याची कारवाई करावी. वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल व ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्याची कार्यवाही एमएसईबी व विद्युत विभागाने करावी. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जड वाहनांच्या प्रवेशावर बंधन घालून, वाहतूक विभागाने नोटीफिकेशन काढून १ सप्ताहामध्ये अंमलबजावणी करावी, अशाही सूचना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी दिल्या.
प्रामुख्याने रेल्वे स्थानकाजवळील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलीस विभाग, आरटीओ, शहर वाहतूक विभाग व महापालिका अधिकारी यांनी संयुक्त पथके तयार करून सकाळी 0६.00 ते ११.00 व सायं. 0६.00 ते १०.00 कारवाई करावी, असे परखड निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे पार्किंगसाठी वाहतूक विभागाने PARKING SPOTS ची निश्चित करावेत आणि नो पार्किंगमध्ये तीव्र कारवाई करावी, स्कायवॉक नियमित स्वरुपात स्वच्छ ठेवून सकाळी 0६.00 ते रात्री १०.00 वाजेपर्यंत खुले ठेवावेत. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक या रस्त्यावर एक दिशा मार्गाची कटाक्षपणे अंमलबजावणी करावी व नो एंट्री बोर्ड लावण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वी विसर्जनस्थळी शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व पोलीस यांनी संयुक्त पाहणी करुन तेथे प्राधान्याने सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी दिले.
सदर बैठकीस ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनयकुमार राठोड, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-१ प्रल्हाद रोडे, अतिरिक्त आयुक्त-२ धैर्यशील जाधव, महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, पोलीस विभागाचे इतर अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल, महापालिकेचे इतर अधिकारी, एमएमआरडीएचे प्रतिनिधी, एमएसआरडीसी व एसटी महामंडळचे प्रतिनिधी, रेल्वे स्टेशन मॅनेजर इ. उपस्थित होते.
