डोंबिवली (शंकर जाधव ) : एक साप चक्क स्कूटरच्या इंजिनमध्ये दिसताच स्कूटरच्या मालकाने पॉज संस्थेला फोन करून माहिती दिली. रविवारी २८ तारखेला डोंबिवलीत घडलेली ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पॉज संस्थेचे स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला स्कूटरमधून सुखरूपरित्या बाहेर काढले. सापाला सुखरूपरित्या निसर्गाच्या सानिध्यात मुक्त सोडण्यात आले.
हा १ फुटाचा डुरक्या घोणस जातीचा पूर्णपणे बिनविषारी साप असून तो खूप सुस्त असतो आणि ठाणे जिल्ह्यात याचे वास्तव्य नेहमीच असते. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असून मानवाला याचा धोका नसतो असे पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले.
दरवर्षी पॉज संस्था ही शेकडो वन्यजीवांच्या मदतीला धावून जाते आणि गेल्या २४ वर्षांत संस्थेने हजारो वन्यजीव पुनर्वसित केले आहेत. संस्थेच्या 9820161114 ह्या हेल्पलाईन वर कॉल करा असे आवाहन निलेश भणगे यांनी केले आहे.
