माजी आमदार नरेंद्र पवार यांची सूचना
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचर्याचे संकलन, वर्गीकरण, विघटन आणि वाहतूक यासाठी सध्यस्थितीत महापालिका स्वतः गेली काही वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी राज्य सरकारने सन २०१० साली नगरोत्थान अभियाना अंतर्गत मिळालेल्या ४१ कोटी अनुदानातून घनकचरा संकलनासाठी १२५ वाहने खरेदी करून महापालिका क्षेत्रातील उंबर्डे गावातील १० हेक्टर क्षेत्रात घनकचरा विघटन प्रकल्प उभा केला. या उपलब्ध सामुग्रीच्या माध्यमातून सदर कामासाठी महापालिकेने सन २०१० मध्ये ठेकेदाराची नेमणूक केली. मात्र ठेकेदारकडून याकामासाठी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला. या कामासाठी ठेकेदारांचा मागील अनुभव वाईट असताना महपालिका प्रशासनाने पुन्हा याकरिता ठेकेदार नेमणुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. सदारची बाब लक्षात घेऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनातून त्यांनी कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापणासाठी सरसकट खाजगीकरणाला विरोध करीत नव्या पर्यायांवर विचार करा असा सल्ला दिला. तसेच या कामाचे टप्या टप्याने ठेकेदारकडून गुणवत्तेच्या निकषावर आधुनिक प्रणालीव्दारे नियोजन करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या. याबाबत सदरचे काम खाजगी ठेकेदारला देताना प्रयोगिक तत्वावर देऊन त्याच्या कामाची गुणवत्ता पाहूनच पुढील प्रभागांचे काम देण्यात येईल असे आश्वान आयुक्तांनी माजी आमदार पवार यांना दिले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचे संकलन करणे, वर्गीकरण करणे व त्याची वाहतूक करणे आदी कामे ठेकेदाराच्या माध्यमातून सन २००५ सालापासून केले जात होते. सन २०१० मध्ये महापालिकेच्या सर्व प्रभागात मे. अँथोनी या ठेकेदाराला याच कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. परंतु १ वर्षाच्या कालावधीतच सदर कामाचा बोजवारा उडाला. या कंपनीने घनकचरा संकलनासाठी महापालिकेने उपलब्ध केलेल्या वाहनांची देखभाल न घेतल्याने मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चालढकलीमुळे महापालिकेची प्रतिमा नागरिकांमध्ये खराब झाली. महापालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन, वर्गीकरण व वाहतूक आदी काम खाजगी ठेकेदाराकडून करण्याचा अनुभव वाईट असताना महापालिकेने सन २०१६ मध्ये देखील ४ प्रभागाचे घनकचरा संकलनाचे व वाहतुकीचे काम खाजगी ठेकेदाराला दिले. सदरचे काम देखील खाजगी ठेकेदाराकडून समाधानकारक झाले नाही. वारंवार खाजगी ठेकेदाराकडून सदरच्या कामात अनियमितता व नियोजन शून्य कामाचा अनुभव येत असताना महापालिका प्रशासन याच कामासाठी पुढील काळात खाजगी ठेकेदार नियुक्त करीत असल्याची महिती माजी आमदार नरेंद्र पवार यांना मिळाली.
यानंतर माजी आमदार पवार यांनी या विषया संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त जाखड यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापणासाठी सरसकट खाजगीकरणाला विरोध करीत याबाबत महापालिकेचे घनकचरा विभागातील काही तस्म अधिकारी व महापालिकेचे समंत्रक (कन्सल्टंट) महापालिकेची आर्थिक फसवणूक व दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे या कामासाठी लागणारा सद्यस्थिती पेक्षा वाढीव खर्चाचा बोजा महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे का ? हा महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. याबाबत माजी आमदार पवार यांना माहिती देताना आयुक्त जाखड यांनी या कामासाठी सदर ठेकेदारकडून नवीन वाहनाच्या व अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे महपालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. तसेच याकामासाठी १० वर्षासाठी ८५ कोटी खर्च अपेक्षित असून तो या परिस्थितीत १५ टक्के जास्त असल्याचे स्पष्ट केले. मात्र हा खर्च जास्त असला तरी कचरा संकलनासाठी नवीन वाहने व काम अत्याधुनिक पद्धतीने होणार असल्याने कामाची गुणवत्ता सुधारेल असे आश्वासन त्यांनी माजी आमदार पवार यांना दिले.