पुलांची खोली आणि रुंदी वाढविल्यास पूरपरिस्थिती कायमची आटोक्यात येईल

 



शिवसेनेचे पालिका आयुक्तांना निवेदन


डोंबिवली ( शंकर जाधव )  : दोन - तीन दिवसापासून मुसळधार पावसाने निर्माण झालेला धोका लक्षात घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश  शिंदे व  माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांची भेट घेऊन पुलांची खोली आणि रुंदी वाढविल्यास  पूरपरिस्थिती कायमची आटोक्यात येईल असे निवेदन दिले.


    विठ्ठलवाडी स्मशानभूमी जवळील अरुंद पुलामुळे पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याने  कल्याण पूर्वेतील साईनगर, कैलास नगर, खडेगोळवली आणि नेहरूनगर हा परिसर पाण्याखाली येऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. २६ जुलै, २००५ लाही याठिकाणी जीवित हानी देखील झाली होती.  पूना लिंक रोड कोहिनूर प्लाझा समोर असलेल्या पुलाची देखील नव्याने बांधणी करून त्याची खोली आणि रुंदी वाढवल्यास पाण्याचा प्रवाहाचा निचरा होण्यास मदत होऊन नागरिकांना कायमस्वरूपी खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र याबाबत अनेकदा प्रशासनाकडे मागणी करून देखील कारवाई होत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली.


 पुराच्या पाण्यामुळे साईनगर, कैलासनगर, नेहरूनगर, खडेगोलवली आणि तिसगाव व  संतोषनगर परिसरातील नागरिकांच्या आयुष्यात  निर्माण होणाऱ्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या दोन्ही ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या दोन्ही पुलांची खोली आणि रुंदी वाढवण्याच्या कामाचे पुढील एक महिन्यात टेंडर काढून तात्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासित शिवसेनेला देण्यात आले.नव्याने  दोन्ही पुलांची खोली आणि रुंदी वाढवल्यास पावसामुळे निर्माण होणारी  पूर परिस्थिती कायमची आटोक्यात येऊन, कैलास नगर, साईनगर, खडेगोळवळी, नेहरूनगर  आणि तिसगाव संतोषनगर या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी दिलासा मिळून भविष्यात त्यांचे होणारे आर्थिक नुकसान टळणार असल्याचे यावेळी शिवसेनेने सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post