पॅरिस : ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू पॅरिसला पोहोचले आहेत. खेळाडूंना सामावून घेण्यासाठी, फ्रान्सने पॅरिसच्या उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर सेंट-डेनिस, इले सेंट-डेनिस आणि सेंट-ओएनजवळ क्रीडा गावाची निर्मिती केली आहे. १,३३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सुंदर क्रीडा खेड्यात पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. मात्र अन्नाचे विविध प्रकार असून देखील त्यांच्या कमतरतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक, पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा खेड्यात भारतीय खेळाडूंसाठी जेवणाचे प्रकार खूपच मर्यादित आहेत. यातील काही भारतीय खेळाडू पूर्णपणे शाकाहारी देखील आहेत.
भारतीय दुहेरीची बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टो म्हणाली, आज जेवणात राजमा होते, पण आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत ते संपुष्टात आल्याने भारतीय खेळाडूंना अडचण निर्माण झाली होती, याबाबत इतर काही भारतीय खेळाडूंनीही तक्रार केली असून एवढ्या लवकर अन्न संपणे अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये जागतिक पाककृती, हलाल, आशियाई आणि फ्रेंच खाद्यपदार्थांसाठी पाच स्वतंत्र हॉल असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय बॉक्सर काही दिवसांपूर्वी खेळगावला पोहोचले होते. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेला अनुभवी बॉक्सर अमित पंघल याने सांगितले की, दुपारचे जेवण खूपच खराब होते, त्यामुळे त्याने त्यांच्या सपोर्ट टीमला रात्रीच्या जेवणासाठी डाळ आणि रोटीची व्यवस्था करण्यास सांगितले आणि तो यावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन खेळाडूंना खाण्याच्याबाबतीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांचे खेळाडू मुख्य डायनिंग हॉलजवळ थांबले आहेत. ब्रिटीश खेळाडू एका छोट्या बेटासारख्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. त्याचवेळी यजमान फ्रान्सचे खेळाडू तीन इमारतींमध्ये थांबले आहेत.
११७ भारतीय खेळाडू ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी झाले आहेत, ज्यांच्या निवासासाठी क्रीडा व्हिलेजमध्ये ३० अपार्टमेंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सात मजली ब्लॉक बाहेरून तिरंग्याच्या रंगात रंगवले आहेत. भारतीय संघाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय खेळाडू सध्या येथील वातावरणाचा आनंद घेत आहेत त्यामुळे इतर गोष्टींवर स्पर्धा सुरू झाल्यावर लक्ष दिले जाईल.
गेम्स व्हिलेजमध्ये काही उणिवा असूनही भारतीय खेळाडू इथल्या वातावरणाचा खूप आनंद घेत आहेत. भारतीय शटलर एचएस प्रणॉय जवळच असलेल्या नदीच्या काठावर वेळ घालवत आहे. त्याचबरोबर हॉकी संघाचे बचावपटू सुमित आणि जुगराज सिंग हे क्रीडाग्रामच्या प्रत्येक भागाचे निरीक्षण करत आहेत. तो म्हणाला, संपूर्ण खेलगावच खूप मजेशीर आहे, आपण आपला वेळ कुठेही घालवू शकतो. त्याच वेळी, चिनी खेळाडूंना शांतता आवडते आणि त्यांना त्यांच्या इमारतीत कोणताही आवाज नको असतो त्यामुळे त्यांचा ब्लॉक सर्वात शांत मानला जातो.