अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबाग तालुक्यातील सारळ घोळ धरण प्रकल्प आज गेली ४४ वर्ष वनखात्याच्या लाल फितीत अडकून पडला आहे. सत्तांतर झाली , राज्यकर्ते बदलले. पण अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा पाणी प्रश्न मार्गी लावणारा हा धरण प्रकल्प काही झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदासंघाचे अध्यक्ष अमित नाईक यांनी पुन्हा एकदा या महत्वाच्या प्रकल्पाकडे शासनाचे आणि मंत्र्याचे लक्ष वेधले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अमित नाईक यांनी सारळ घोळ धरण प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी लावून धरली.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून अमित नाईक हे सभेला उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या या बैठकीत खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील यांच्या सह सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. अमित नाईक यांनी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा पाणी प्रश्न कायस्वरूपी सुटण्यासाठी सारळघोळ धरण किती महत्वाची भूमिका पार पाडेल हे पटवून दिले. नाईक यांनी या सभेत चार महत्वाच्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
त्यात पाणी प्रश्नाबरोबर सारळ परिसरातील नवखार, बोडणी, कावाडे, बेलपाडा, कोप्रोली आदी गावात विजेची समस्या आहे. सतत वीजपुरठा खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे या सारख्या समस्या निर्माण होतात. त्या दूर करण्यासाठी नवीन सबस्टेशन उभे राहावे, याकरिता मागणी केली.
उन्हाळ्यात डोंगर भागात वणवे लागतात, त्यामुळे वनसंपत्तीची हानी होते आणि वन्यप्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ती आग तात्काळ : आटोक्यात आणण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, ही मागणी अमित नाईक यांनी केली. तसेच अलिबाग ही जिल्ह्याची राजधानी आहे. या मुख्यालयात अनेकदा राज्याचे मंत्री, विविध कार्यक्रमासाठी येत असतात. त्यांचा प्रवास हेलिकॉप्टरने होतो. पण हेलिकॉप्टर उत्तरविण्यासाठी आरसीएफ, गेलं कंपनीचे हेलिपॅड वापरावे लागते. त्यामुळे शासनाचे हेलिपॅड उभे करावे, अशी मागणी देखील अमित नाईक यांनी या सभेत केली.