खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे उद्गार
कल्याण ( शंकर जाधव): अडिवली ढोकळी येथील वनविभागाच्या वनजमिनीवर महापालिकेमार्फत राबविण्यात आलेला वृक्षारोपण हा उपक्रम चांगला असल्याचे उद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी काढले. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते अडिवली ढोकळी येथे वनविभागाचे वनजमिनीवर भव्य वृक्षरोपण मोहिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. समाजातील सर्व घटकांना एकत्रित करुन ही वृक्ष लागवड होत आहे. या वृक्ष लागवडीमुळे जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी सदर परिसरात देशी प्रजातीची सुमारे १२०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये बहावा, पळस, जांभुळ, बकुळ, करंज, आवळा, फणस, कांचन, कदंब या देशी प्रजातीच्या झाडांचा अंतर्भाव आहे. यासमयी पर्यावरण दक्षता मंडळ (डोंबिवली), संत निरंकारी मिशनचे सेवा दल तसेच विविध एनजीओचे प्रतिनिधींनी इतकेच नव्हे, तर नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देखील पर्यावरण विषयक घोषणा देत वृक्ष लागवडीत सहभाग घेतला.
या वृक्षारोपण समयी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, रेंज फॉरेस्ट ऑफीसर विवेक नातु, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, योगेंद्र राठोड, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, किशोर ठाकुर, उद्यान विभागाचे अनिल तामोरे, महेश देशपांडे, महापालिकेचे माजी पदाधिकारी, माजी पालिका सदस्य उपस्थित होते.