डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी डोंबिवली शहरातील पी.पी चेंबर महापालिका कार्यालय येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे , अनधिकृत पार्किंग , झाडांच्या फांद्या तसेच गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गैरसोय यासंदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष भोईर म्हणाले, शहरातील अनेक रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या चारचाकी आणि दुचाकी अनेक दिवसांपासून तशाच पडून असतात. पार्किंगबाबत नियोजन करून पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी एकत्रितपणे बैठक घ्यावी. गणेशोत्सवाआधी रस्त्यामधील खड्डे बुजवावे अशी सूचना केली. यावर पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी गणेशोत्सवाआधी रस्त्यावरीलखड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी मनसैनिक संदीप ( रमा ) म्हात्रे हेही उपस्थित होते.
