येपिक जिम्नॅस्टिक्स क्लब बंगळुरू येथे होणार
मुंबई ( ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत) : जिमनॅस्टिक्स खेळातील महाराष्ट्र संघाचे पूर्व प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते हरीश परब यांनी सन २००५ साली मुबईत जिमनॅस्टिक्स एज ग्रुप डेव्हलमेंट प्रोग्रामची सुरवात केली. अनेक वर्ष सातत्याने त्यानी त्यांच्या वरिष्ठ गटात खेळणाऱ्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय खेळाडूंनाबरोबर घेऊन यासंबंधी स्पर्धा मुंबईत आयोजित केल्या , या कार्यक्रमात मुंबईतील अनेक शाळा क्लब यांनी आपला सहभाग दाखवला होता. मात्र प्रत्येक वर्षी यात काहीना काही त्रुटी येत गेल्या व अखेरीस सुमारे १५ वर्षे हा कार्यक्रम राबवत व वेळोवेळी येणाऱ्या त्रुटीमध्ये सुधारणा करत २०२२ रोजी, बंगळुरू येथील RnR Fit जिमनास्टिक्स सेंटरमधे पहिल्या आयजीसीआय स्पर्धेची सुरवात करण्यात आली.
जिमनॅस्टिक्स हा खेळ तांत्रिक रित्या अवघड असल्याकारणाने खेळाडूना अनेक वर्ष सराव करावा लागतो व त्यानंतरच खेळाडूमधील सुप्त गुण लक्षात येतात, तसेच वेळोवेळी होणाऱ्या खेळाडूच्या शरीरातील बदलावरही लक्ष ठेवावे लागते. वयाच्या अवघ्या ५ वर्षापासून ते १५ वर्षापर्यंत म्हणजेच सुमारे १० वर्षे सराव केल्यानंतर खेळाडूला स्पर्धात्मक जिमनॅस्टिक्स मध्ये आपले कौशल्य दाखवता येते. त्यामुळे काही काळ खेळाडूना या खेळात टिकवून ठेवणे हेच प्रशिक्षकासाठी मोठे आव्हान असते.
आपल्या कडे असलेल्या अनुभवाचा महाराष्ट्राबरोबर भारतातील जास्तीत जास्त खेळाडूना फायदा घेता यावा म्हणूनच आम्ही ही स्पर्धा संपूर्ण भारतात आयोजित करतो असे हरीश परब यांनी नमूद केले.
स्पर्धेची उद्दिष्टे :
१. राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रत्तेक राज्यातून केवळ प्रत्तेक गटात ६ खेळाडूना खेळण्याची संधी मिळत असते, त्यामुळे बाकी खेळाडूना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी प्राप्त होत नाही, कालांतराने हे खेळाडू हा खेळ सोडून देतात. व मग स्पर्धात्मक खेळात अगदी बोटांवर मोजण्याइतकेच खेळाडु उरतात, व मग यातही कोणाला खेळताना अपघात झाला की ही संख्या शून्यावर येते. आणि म्हणूनच भारताला प्रतेक वर्षी दीपा कर्माकर वर अवलंबुन राहावे लागते. भविष्यात दिपा कर्माकर सारखे अनेक खेळाडु भारतात निर्माण व्हावयास हवे आणि म्हणूनच “आय जी सी आय” ची स्थापना करण्यात आली.
२. “आय जी सी आय” मार्फत संपुर्ण भारतात हा कार्यक्रम राबवून खेळाडूमध्ये जिमनॅस्टिक्स या खेळाची आवड निर्माण करणे व त्यातील सुप्त गुण हेरून त्यांचा भविष्यातील मार्ग निच्छित करणे .
स्पर्धेची वैशिष्ट्ये :
१. ही स्पर्धा पूर्णपणे भारतीय कार्यकमानुसार बनवण्यात आलेली आहे
२. या स्पर्धेत भारतातील कोणताही खेळाडू आपला सहभाग नोंदवू शकतो
३. या स्पर्धेत खेळाडूची स्पर्धा ही प्रतिस्पर्ध्याशी नसून ती त्याच्या वयक्तिक गुणवत्ते नुसार मोजली जाते
त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूला पदके त्याला मिळालेल्या मार्कांनुसार दिली जातात. उदा. ९.५० च्या पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या सर्व खेळाडूस प्लेटिनम, ८.५० च्या वर सुवर्ण, ७.५० च्या वर रौप्य , ६.५० च्या वर कास्य पदक तर त्याहून कमी मार्क मिळवलेल्या सर्व खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येते.