खड्डे, गटारी आणि पाणी याची समस्या दाखवत शिंदेच्या शिवसेनेसह महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न
डोंबिवली (शंकर जाधव ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे या लाडकी बहिण योजनेची विरोधकांकन खिल्ली उडवली जात आहे.
एकीकडे लाडक्या बहिणीला खुश केले जात असतानाच राज्यातला मतदार मात्र अनेक समस्यांनी ग्रासला असून या समस्याना उपरोधिकपणे वाचा फोडत कल्याणात ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी लडकी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या योजना असा उल्लेख करत कल्याण पश्चिम व स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे.या बॅनरवर माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका कचऱ्याचा ढीग , माझा लाडका रस्त्यावर तुंबलेले पाणी, माझा लाडका घरात शिरलेले गटाराचे पाणी यासारख्या योजना शासनाकडून नागरिकांना मोफत देत नागरिकांना भंडावून सोडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या चित्राच्या माध्यमातून सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाली आहे.