कोलकाता : येथील सरकारी रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहेत. डॉक्टर संघटना न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणावर, कोलकाता पोलीस आयुक्त विनीत कुमार गोयल यांनी रविवारी सांगितले की जॉइंट सीपी क्राइमने मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे.
फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने RG हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांनी सोमवारी देशभरातील हॉस्पिटलमधील वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या हत्येचा निषेध केला आहे. या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी आयएमएने केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने वैद्यकीय अधीक्षक-सह-उप-प्राचार्य संजय वशिष्ठ यांना काढून टाकल्यानंतर त्यांच्याजागी बुलबुल मुखोपाध्याय यांना अधीक्षक म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.