दिवा, (आरती मुळीक परब) : निळजे गावातील रघुनाथ पाटील यांच्या घरी (मोठ्या घरी) नऊ भाऊ मिळून एकत्र गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. याच ठिकाणी कवी, संगीतकार राजेंद्र पाटील यांनी गणेशोत्सवानिमित्त 'आगरी साहित्य शाळे' च्या सहकार्याने कविता- गाण्यांच्या एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन पाटील रेसिडेन्सी, मोठा घर मु.पो.निळजे येथे केले होते.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून निळजे गावचे माजी सरपंच गिरीधर पाटील उपस्थित होते. तर अध्यक्ष पदाची धुरा सुप्रसिद्ध साहित्यिक 'धवलारीन एक आगरी पुरोहित. 'फेम नवनाथ ठाकूर यांनी सांभाळली. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध आगरी साहित्यिक,‘कनगा’ फेम कवी जयंत पाटील, निवेदक गीतकार, संगीतकार कविकिरण पाटील यांनी उपस्थित राहून निवेदनाची धुरा सांभाळली. सर्वच कवी- कवयित्री, गायक यांनी कविता व गाण्यांनी भक्तिमय वातावरण निर्मिती करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी गायक, ज्येष्ठ कवी सुनील पाटील, नितूराज पाटील, हरिश्चंद्र दळवी, मंगेश म्हात्रे, जय म्हात्रे, चंद्रकांत पाटील, अभिनेत्री प्रज्ञा म्हात्रे, उत्कर्षा पाटील, श्रावणी पाटील या सर्वांचे सादरीकरण अप्रतिम होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नामदेव पाटील, बाबुराव पाटील, श्रीपत म्हात्रे, मनोहर पाटील, राजाराम पाटील, धरम सुर्यवंशी यांची लाभली. मान्यवर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष यांच्या मनोगता नंतर राजेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. याच उत्साहाने स्नेह भोजनानंतर ही पुन्हा एकदा मैफिल रंगली.