Kolhapur- Ahmedabad aeroplane: कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवेला २७ ऑक्टोबरचा मुहूर्त



खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर :  कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्‍या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध असल्यामुळेच कोल्हापू- अहमदाबाद थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर- अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. 


कोल्हापूर विमानसेवेचा आता गतीने विस्तार होत आहे. कोल्हापूरहून तिरूपती विमान सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर नागपूर आणि गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कोल्हापूर-अहमदाबाद या विमानसेवेची मागणी आता पूर्ण होणार आहे. २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते अहमदाबाद या मार्गावर थेट विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमानसेवा सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. या विमान सेवेमुळे अहमदाबादसोबतच संपूर्ण गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर कनेक्ट होणार आहे. याशिवाय कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील विमानसेवाही लवकरच सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी महाडिक यांनी सांगितले.

 कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उडाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोचेल. तसेच अहमदाबादहून १२ वाजून ४५ मिनिटांनी विमान उडेल आणि २ वाजून ५ मिनिटांनी कोल्हापुरात पोचेल. त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू झाल्याचीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post