दिवा, (आरती मुळीक परब) : रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धीम्या मार्गावर असणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे मुंब्रा, दिवा, कोपरवासीयांचे मेगा हाल झाले आहेत. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे नागरिकांची किमान अर्धा ते एक तास रखडपट्टी झाली आहे. हा मेगा ब्लॉकमुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्लीवरील नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
रविवार म्हटले की मुंबई, ठाण्यात कामाला येणाऱ्या ४० ते ५० टक्के नागरिकांचा सुट्टीचा दिवस असतो. पण त्यामुळे रेल्वे नेहमी रविवारीच मेगा ब्लॉक घेत असते. या मेगा ब्लॉकमध्ये रेल्वेतील तांत्रिक कामे, ट्रॅकची कामे, पेंटाग्राफची कामे केली जातात. पण त्याचा फटका नागरिकांना नक्कीच बसतो. आजच्या दिवशी रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. त्यांना एक ते दीड तास कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाण्यामध्ये लोकलची वाट पहावी लागली आहे. त्यानंतर कल्याणच्या पुढून भरुन आलेल्या लोकलमध्ये चढायला न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यात ही जलद अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सुरु असल्याने ती जलद लोकल पकडण्यासाठी नागरिकांचा एकच गोंधळ उडाला.
मुंब्र्यात अप, डाऊनच्या धीम्या मार्गांवरील लोकल न थांबल्याने तेथील नागरिकांनी रिक्षाने दिवा गाठून नंतर मुंबई आणि कल्याण कडे लोकलने प्रवास केला.
दिवावासीयांना जलद मार्गावरील फलाट चार व तीनवरून लोकलने प्रवास करताना मुंब्र्यावरून आलेल्या प्रवाशांमुळे चेंगराचेंगरी झाली. तसेच दिव्यातील फलाटांवर धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद असल्याच्या सारख्या उद्घोषणा हाेत होत्या. तसे असतानाही प्रवाशी फलाट एक, दोनवर थांबून नंतर जलद मार्गावर लोकल येताच स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रॅकवर उतरून उटल्या बाजूने जलद लोकल पकडत होते. कोपरला ही धीम्या लोकल न थांबल्याने नागरिकांनी डोंबिवलीवरूनच पुढील प्रवास केला. तर काही कोपरवासीयांनी कोपर ते डोंबिवली ट्रॅकवरून प्रवास करून डोंबिवली गाठले.