पाण्यासाठी त्रस्त महिलांनी तिरडीला दिला खांदा
दिवा, (आरती मुळीक परब) : बेडेकर नगर वासियांना गेले ८ ते १० महिने भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नावर दिवा प्रभाग समितीकडे अनेक वेळा पाठपुरावा करुनही पालिका अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे ठोस काम करण्यात न आल्याने महापालिकेच्या मुजोर आणि कामचुकार अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी बुधवारी दिवा प्रभाग समितीवर बेडेकर नगर येथील नागरिकांकडून तिरडी घेऊन मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पाणी द्या.. पाणी द्या, नाही तर खुर्च्या खाली करा.. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा ही मोर्चामध्ये महिलांकडून देण्यात आल्या.
बेडेकर नगरवासीयांना होत नसलेल्या पाणीपुरवठ्याबाबत ३१ जुलै आणि २४ सप्टेंबर अशा २ वेळा पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण त्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी पालिका अधिकारी पूर्ण करू शकले नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक पाणी असून ते ही वेळेत रोजच्या रोज तेथील नागरिकांनी मिळत नाही. तर दिव्यात टॅंकरचे विकतचे पाणी लगेच मिळते पण तेच पाणी आमच्या पाण्याच्या लाईनला येतच नाही. आम्ही मध्यम वर्गीयांनी हे असे किती दिवस विकतच पाणी घेऊन दिवस काढायचे असा, प्रश्न नागरिकांकडून येत आहे.
संपूर्ण दिवा शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या ज्या भागातून सुरु होतात तेथेच पहिले येणारे नगर हे बेडेकर नगर आहे. तेथील पाच ते दहा हाजाराच्या वरील लोकसंख्येला पाणी समस्येने ग्रासलेले आहे. रात्री अपरात्री पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना जागावे लागते. तरी ही एक हंडा पाणी मिळत नाही, असे बेडेकर नगरमधील महिला सांगतात. त्यांच्या या रागाचा स्फोट होऊन आज दुपारी दिवा प्रभाग समितीवर अधिकाऱ्यांच्या नावाने तिरडी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महिलांनीच स्वतः ही तिरडी खांदा देऊन मडकी उचलून निषेध नोंदवला आहे.
बुधवारी बेडेकरवासीय पाणी समस्येवर तिरडी मोर्चा आणणार हे आधीच पालिकेला निवेदनातून कळवले होते. तरीही पालिकेत तिरडी मोर्चा आल्यानंतर ही कोणतेही अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. दिवा प्रभाग समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंते सुरेश वाघिरे हे सुट्टीवर होते तर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंखे हे ठाणे पालिकेमध्ये मिटिंगमध्ये होते. ती मिटिंग संपल्यावर पाऊण तासाने दिवा प्रभाग समितीवरील तिरडी मोर्चाला उत्तर देण्यासाठी पोहोचले. दिवा प्रभाग समितीवर तिरडी मोर्चा आणूण ही महिलांना अधिकाऱ्यांची वाट बघत तातकळत रहावे लागले.
जिवंत माणसांना समस्या, अडचणी या समजतात पण मेलेल्या माणसांना त्या समजत नाही. तर या अशा मुर्दाड पालिका अधिकाऱ्यांच्या नावाने आज आम्ही बेडेकर नगर वासिय, महिलांनी तिरडी मोर्चा घेऊन पालिकेवर जाऊन निषेध केला.
अंकीता कदम, नागरिक