कर्जत येथील बनावट सिगारेट फॅक्टरीवर पोलिसांची कारवाई

 


चार कोटी ९४ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

अलिबाग (धनंजय कवठेकर) :  रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी येथील बनावट गोल्ड फ्लॅक सिगारेटच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत १५ जणांना अटक करण्यात आली असून चार कोटी ९४ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 



फॉर्म हाऊसमध्ये बनावट सिगारेट तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करीत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १५ जणांना अटक केली आहे. गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावे बनावट सिगारेट तयार करण्याचा कारखाना चालविणाऱ्याचे कनेक्शन हैदराबाद येथील असल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.



रायगड जिल्ह्यातील कर्जत भागात फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. याच परिसरात अब्बास नावाचे फार्महाऊस आहे. चारही बाजूने बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेट तयार होत असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी या अवैध धंद्यावर छापा टाकला. 



या छाप्यात सिगारेट तयार करण्यासाठी लागणारा  माल, तसेच तयार सिगारेट व मशीन असा एकूण चार कोटी ९४ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात तयार केलेले सिगारेट दोन कोटी, ३१ लाख ६० हजार रुपये, सिगारेट तयार करण्यासाठी १५ लाख ८६ हजार रुपये व सिगारेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशनरी दोन कोटी ४७ लाख रुपयांचा ऐवजाचा समावेश आहे. या गुन्ह्यात १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post