एकूण १,०६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना दोन इसम मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करीत आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने कारवाई करताना दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मोटारसायकल व तीन बांधलेल्या तलवारी असा एकूण १,०६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहितादरम्यान बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे तसेच विक्री करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना उत्तम कांबळे व प्रविण लोखंडे यांनी त्यांच्या मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगले, सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सर्जे, अशोक पोवार, युवराज पाटील, महेश पाटील, प्रदिप पाटील, विनोद कांबळे व हंबीर अतिग्रे यांना उत्तम कांबळे व प्रविण लोखंडे यांनी आपल्या मोटारसायकलला तलवारी बांधून ठेवल्याची माहिती मिळाली, त्या अनुषंगाने नमुद पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून उत्तम मारुती कांबळे (२७) व प्रविण दौलत लोखंडे (२०) त्यांच्या ताब्यातील यामाहा मोटारसायकल व तीन बांधलेल्या तलवारी असा एकूण १,०६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी सदर इसमांविरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगले, सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सर्जे, अशोक पोवार, युवराज पाटील, महेश पाटील, प्रदिप पाटील, विनोद कांबळे व हंबीर अतिग्रे अशांनी केलेली आहे.