स्थानिक गुन्हे अन्वेशनची आठवड्यात दुसरी कामगिरी
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने कोल्हापूर येथे या आठवड्यात दुसरी कामगिरी करत तब्बल वीस लाख रुपये किंमतीचे १३३ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करून,अमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांना जोरदार हादरा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संशयितआरोपी निलेश जाधव हा हे कोकेन अमली पदार्थ मुंबईतून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस खात्याला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा परिषद रोड नागाळा पार्क येथे एक युवक संशतीचा फिरताना दिसला. खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकाकडे चौकशी केली असता प्रथम खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी पोलीसी खात्या दाखवतच त्याच्याकडे वीस लाख रुपये किमतीचे कोकेन सापडले. या प्रकरणात निलेश राजेंद्र जाधव ( ४०) त्याच्याजवळ १९ लाख ९५ हजार किमतीचे १३३ ग्रॅमचा कोकेन हा अमली पदार्थ सापडला. तसेच २०,००० रुपयाचा मोबाईल असा एकूण २० लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी पंचनामा करून रीतसर कायदेशीर प्रक्रिया करूनजप्त करत, शाहूपुरी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे अमली पदार्थ साठा आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कामगिरी करा, असा आदेश दिल्यानंतर पोलीस यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.या कारवाईत पोलीस पथक मधील पोलीस अंमलदार विनायक चौगुले, प्रकाश पाटील, अशोक पवार, अमित सर्जे, वैभव जाधव, सुरेश पाटील, रुपेश माने, शिवानंद मठपती, अनिल जाधव, सुशील पाटील, सहभागी होते.
कोल्हापुरामध्ये सध्या गांजाबरोबर आता कोकेन देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गांजाची एक पुडी शंभर रुपये ते दोनशे रुपयेला मिळते. चरस एक ग्रामची किंमत हजार ते दीड हजार तीन हजार रुपये च्या घरात विकली जाते. कोकेन प्रति ग्राम १५ हजार रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आता अतिश्रीमंत घराण्यातले काही लोक कोकेनचे ग्राहक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर हा तपास करून अंमली पदार्थांची विक्री थांबविणे हे एक आव्हान असणार आहे.