डोंबिवली ( शंकर जाधव ) : विधनासभेच्या निवडणूका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवाराची संख्या वाढत चालली आहे.कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे राजू पाटील हे आमदार आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. याच पक्षातील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनीही कल्याण मतदार संघाकरता उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली आहे. मुंडे यांनी निवडणूक लढवण्याची पक्षाकडे मागणी केली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात दिवा शहरातील काही प्रभाग येतात. दिवा शहरात एक खंबीर राजकीय नेता म्हणून रोहिदास मुंडे यांचे नाव आहे. भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत मुंडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. दिवा शहरातील अनेक नागरिक समस्या सोडविण्यासाठी पुढे असलेल्या मुंडे यांना यंदा विधानभवनातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची इच्छा आहे. मात्र याआधी याच पक्षातील सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढावीत विजय मिळविला होता. त्यानंतर मनसेचे प्रमोद ( राजू ) पाटील यांनी निवडणूक लढावीत मनसेचे इंजिन पुढे आणले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राजू पाटील यांना उमेदवारी मिळणार यात शंका नाही. आता त्याच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुभाष भोईर हे निवडणूक लढवितील असे बोलले जाते आहे. तशी इच्छा सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. तर याच पक्षातील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनीहि पक्षाकडे याच विधानसभा मतदार संघाकडून उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली. लवकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुभाष भोईर का रोहिदास मुंडे यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल हे जाहीर करतील.
