नवी दिल्ली : २४ तासांत भारतीय विमान कंपन्यांच्या ३० हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर देशभरात गोंधळ उडाला. यामध्ये विस्तारा, एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, विस्तारा, स्पाइसजेट, स्टार एअर आणि अलायन्स एअरच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे.
सातत्याने वाढत जाणाऱ्या धमक्या पाहता केंद्र सरकार या प्रकरणात सक्त होत असल्याचे दिसत आहे. मात्र, या खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांनाही करोडोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुुळे सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने विमानतळांवर सुरक्षा वाढवली आहे. यासोबतच या खोट्या धमक्यांचा अहवाल मागवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे विमान कंपन्यांना ३ कोटी रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागत आहे. सोमवारी एअर इंडियाच्या बोइंग ७७७ विमानाने मुंबईहून न्यूयॉर्कला उड्डाण केले. धमकीनंतर त्याला दोन तासांत दिल्लीत उतरावे लागले. त्याला १०० टन इंधन हवेत सोडावे लागले, कारण लँडिंगसाठी वजन २५० टन असावे लागते. प्रति टन एक लाख रुपये या दराने एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. हॉटेलमध्ये २०० प्रवासी आणि कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था, पुढील फ्लाइटच्या अनिश्चिततेची नुकसानभरपाई आणि परतीसाठी रिकामे विमान न्यूयॉर्कला पाठवण्यासाठी आणखी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
यासोबतच १५ ऑक्टोबरला नवी दिल्लीहून शिकागोला जाणारे बोईंग ७७७ कॅनडात उतरायचे होते. येथून प्रवाशांना शिकागोला दुसऱ्या फ्लाइटने पाठवून तपासासाठी दोन दिवस थांबवून विमान कंपनीला १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. गेल्या एका आठवड्यात ७० फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु तपासात सर्व बनावट असल्याचे आढळून आले. त्याबाबत विस्ताराच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, सोशल मीडियावर पाच आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या. यामध्ये सिंगापूर ते मुंबई, मुंबई ते फ्रँकफर्ट, मुंबई ते सिंगापूर, दिल्ली ते बँकॉक आणि मुंबई ते कोलंबो या विमानांचा समावेश होता.
