Pakistan : दहशतवादी हल्ल्यात बलुचिस्तानमधील २० ठार

Maharashtra WebNews
0


 बलुचिस्तान : १५ ऑक्टोबर रोजी SCO शिखर परिषद होण्याच्या आधीच पाकिस्तानात दहशतवादी कारवाया सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. शुक्रवारी पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी कोळसा खाणीवर हल्ला करत तेथे राहणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. बलुचिस्तानमधील या भीषण घटनेत २० जणांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले. ठार झालेले २० जण खाण कामगार होते. या SCO शिखर परिषदेत जगभरातून लोक येणार आहेत. 


पोलिस अधिकारी हमायून खान नसीर यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा बंदुकधारींनी दुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीत असलेल्या घरांवर हल्ला केला. त्यांनी घरांना वेढा घातला आणि गोळीबार सुरू केला. मारले गेलेले बहुतांश बलुचिस्तानमधील पश्तून भाषिक भागातील होते. ठार झालेल्यांपैकी तीन तर जखमींपैकी चार अफगाण आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. या घटनेत बलुच लिबरेशन आर्मीचा हात असल्याचा संशय पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही संघटना अनेकदा नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले जात आहे. 


बीएलए गेल्या ३ महिन्यांपासून संपूर्ण पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण करत आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात या दहशतवादी संघटनेने ५० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. सुरक्षा दलांनी २१ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २३ प्रवाशांचा समावेश असून त्यापैकी बहुतांश पूर्व पंजाब प्रांतातील होते. बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी या लोकांना बस, वाहने आणि ट्रकमधून बाहेर काढून गोळ्या घातल्या होत्या. 


बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, “दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गरीब मजुरांना लक्ष्य केले आहे. हल्लेखोर क्रूर होते आणि त्यांचा उद्देश पाकिस्तानला अस्थिर करणे हा होता. या निष्पाप मजुरांच्या हत्येचा बदला घेतला जाईल.”


या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता १५ ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये SCO शिखर परिषद होणार आहे. ज्यामध्ये चीन, रशिया, भारत यांचाही समावेश असून त्यांचे प्रतिनिधी पाकिस्तानात येत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)