Anmol bishnoi : अनमोल बिश्नोईला कॅलिफोर्नियातून अटक

 



कॅलिफोर्निया : लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोई विरोधात १८ गुन्हे दाखल आहेत, एनआयएने त्याच्या अटकेसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या महिन्यात भारत सरकारने अजामीनपात्र कलमांतर्गत अनमोल बिश्नोई विरोधात वॉरंट जारी केले होते. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या धाकट्या भावाच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. यावर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अनमोल त्यांच्या देशात असल्याची पुष्टी केली होती. 

अनमोल बिश्नोईवर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. त्याचबरोबर १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अनमोल बिश्नोईचे नाव पुढे आले होते. या प्रकरणी लॉरेन्स आणि अनमोल या दोघा भावांना दोषी ठरविण्यात आले होते.अनमोलविरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते.


सिद्धू मूसवाला खून प्रकरणात अनमोलवर हत्येसाठी वापरलेली शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. अनमोलने त्याचा भाऊ लॉरेन्स बिश्नोईच्या पावलावर पाऊल ठेवत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली आणि २०३३ मध्ये तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. बनावट पासपोर्टवर तो भारतातून पळून गेला होता. अनमोल बिश्नोई त्याचे लोकेशन बदलत राहिला. 


 बाबा सिद्दीका हत्याकांडातील शूटर गुन्ह्यापूर्वी अनमोलच्या संपर्कात असल्याचे मुंबई गुन्हे शाखेने सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि तीन संशयित शूटर कॅनडा आणि अमेरिकेत असताना स्नॅपचॅटद्वारे संदेशांची देवाणघेवाण करत होते.‌ 


लॉरेन्स बिश्नोई अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. लॉरेन्स बिश्नोई हा देशातील अर्धा डझनहून अधिक राज्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड आहे. लॉरेन्स बिश्नोईचे नाव देशातील सर्वोच्च हत्याकांडात चर्चेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post