मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळताच केले काव्य
दिवा, (आरती परब) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून मिळताच महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. या निर्णयाचे स्वागत महाराष्ट्रातील प्रत्येकाने केले. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम केले गेले. असाच एक कार्यक्रम डोंबिवलीतील ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मराठीच्या शिक्षिकेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच एक सुंदर काव्य केले. या काव्याचे वेगळ्या पद्धतीने शाळेतील शिक्षकांकडून स्वागत केले गेले.
व्याकरण हा मराठी भाषेचा पाया आणि व्याकरण जर सुदृढ असेल तर भाषेची इमारत त्यावर डौलदारपणे उभी राहते आणि याच व्याकरणाचं गाणं झालं तर. याचा विचार ही कोणी केला नव्हता. इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी भाषेची वाटणारी भिती त्यातून नक्कीच कमी होऊन भाषेची गोडी लागेल, असे मराठीच्या शिक्षिका भारती पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी लिहिता यावे, बोलता यावे आणि याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी वाढावी, बहरावी या हेतूने मराठी विषयाच्या शिक्षिका भारती पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत, शुद्ध लेखनाचे गाणे लिहिलेल्या फलकाचे शाळेच्या आवारातच ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय अर्चना अरविंद मोहिते आणि माधुरी मनोज प्रधान यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी शाळेत विविध शिक्षकांनी त्या शुध्द लेखनाच्या काव्याचे तोंडभरून कौतूक केले. हे असे वेगळे काव्य प्रत्येकाने एकदा तरी वाचावे, असे ग्रीन्स इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना मोहिते यांनी तेव्हा सांगितले.
