मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्याने महिलांमध्ये नाराजी
शिरोळ, ( शेखर धोंगडे) : मंगळवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिरोळ येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राजकारण बाजूला ठेवून शीला हेगडे आणि त्यांच्या सहकारी वर्षा कोळी तसेच शीला हेगडे यांचे समर्थक आणि मतदारसंघातील तमाम लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माध्यमांशी बोलताना शीला हेगडे म्हणाल्या सदरची सभा ही यड्रावकरांनी आयोजित केली होती. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आमचा लाडके भाऊ आले होते. त्यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी मी आणि आमचे समर्थक तसेच माझ्या मतदारसंघातील बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो. भावाला भेटावे आणि या योजनेबद्दल धन्यवाद देऊन आभार मानावे, यासाठी आम्ही या सभेला दोन वाजल्यापासूनच हजेरी लावली होती. आमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री चार वाजता आल्यानंतर यड्रावकरांच्या समर्थकांनी कोणत्याच बहिणीला भावाला भेटू दिले नाही. ओवाळू देखील दिली नाही. विरोधकांची सभा असूनही आम्ही फक्त भावाला भेटून त्यांचे आभार मानण्यासाठी त्या सभेला उपस्थित होतो.
विरोधकांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी वाघिणीचे काळीजच लागते. असेही लाडकी बहीण संघटनेचे अपक्ष उमेदवार शीला हेगडे म्हणाल्या. ही सभा केवळ मतांसाठी आणि सत्तेसाठी घेतली गेली. भावाला ओवाळण्यासाठी तास दोन तास माझ्या मतदारसंघातील बहिणींनी वाट बघितली. भावाला ओवाळण्यासाठी मुद्दाम भेटू दिले नाही. या सभेत बहिणींचा अनादर झाला असून येत्या निवडणुकीत महिलांचा आदर कसा करावा, या लाडक्या बहिणी मतदानातून दाखवून देतीलच, असे ही शीला हेगडे म्हणाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ येथे घेतलेल्या सभेत महिलांचा अनादर झाल्याने ही सभा व्यर्थ होणार ! अशी शिरोळ मतदारसंघातील समस्त लाडक्या बहिणीमध्ये चर्चा सुरू आहे.


