कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : सध्या विधानसभा निवडणुका २०२४ ची आचारसंहिता सुरू झाली असून आगामी निवडणुका या खुल्या व भयमुक्त वातावणात पार पडाव्यात तसेच नागरिकांना कोणत्याही प्रलोभनांना, आमिषाला बळी पडू नये याकरीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असले अवैद्य व्यवसायाची माहिती काढुन परीणाम कारक कारवाई करून अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध दारूची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती.
अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व राजू कांबळे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पार्ले, ता. चंदगड गावचे हद्दीतील जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याचे शेडचे बाजूला उघडयावर गोवा बनावटीचे दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने पार्ले, ता. चंदगड येथे जावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवाजी धाकलू गावडे ( ३८, रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे ७,४०,८८०/-रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली.
याबाबत इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकविण्यासाठी गोवा राज्यातून विक्री करण्यासाठी आणली असल्याची कबूली दिलेली आहे. सदरची दारू कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करणेत आलेली असून नमुद इसमाविरुध्द प्रोव्ही कायद्यान्वये चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करीता चंदगड पोलीस ठाणेच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, प्रकाश पाटील, दिपक घोरपडे, सागर चौगले व सुशील पाटील यांचे पथकाने केलेली आहे.
