Border - Gavskar trophy : विराट कोहलीने झळकावले ३० वे शतक


ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला 

सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांचा विक्रम मोडला 


पर्थ : येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाज विराट कोहलीने आपला खराब फॉर्म मागे टाकत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले आहे. पहिल्या डावात पाच धावा करून बाद झालेल्या कोहलीने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३० वे शतक झळकावले. कोहलीपूर्वी यशस्वी जैस्वालनेही भारतासाठी या सामन्यात शतक झळकावले होते. 


भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा करून डाव घोषित केला. विराट कोहलीच्या शतकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विराटने १४३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. लियॉनच्या चेंडूवर चौकार मारून विराटने आपले शतक पूर्ण केले.


या शतकासह कोहली ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे. कोहलीचे हे ऑस्ट्रेलियातील सातवे कसोटी शतक आहे, तर सचिनने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात सहा शतके झळकावली होती. एवढेच नाही तर सहा वर्षांनंतर कोहलीचे ऑस्ट्रेलियातील कसोटी फॉर्मेटमधील हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर या फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.


कोहलीचा यंदाचा रेकॉर्ड चांगला नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीपूर्वी, त्याने यावर्षी सहा कसोटी सामने खेळले आणि २२.७२ च्या सरासरीने २५० धावा केल्या, ज्यात अर्धशतकांचा समावेश होता. मात्र, त्याचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड चांगला आहे, त्यामुळे कोहलीची बॅट बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जोरदार बोलेल, अशी आशा वाढली आहे. कोहलीने अपेक्षा पूर्ण केल्या आणि मालिकेतील पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून त्याचा धावांचा दुष्काळ संपवला. 


कोहलीचा ऑस्ट्रेलियात चांगला रेकॉर्ड आहे आणि त्याने १४ सामन्यात ५६.०३ च्या सरासरीने १४५७ धावा केल्या आहेत. कोहलीने या काळात सात शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर २०११-१२ आणि २०१४-१५च्या दौऱ्यांमध्ये तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. २०१४-१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. या मालिकेत  त्याने चार सामन्यांत ८६.५० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या, ज्यात चार शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. 








Post a Comment

Previous Post Next Post