Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत संभ्रम

Maharashtra WebNews
0

डिसेंबरमध्ये १५०० मिळणार की २१००  याबाबतची प्रतीक्षा

ठाणे : महायुतीने यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेत महिलांना मोठ्या प्रमाणात मतदानासाठी प्रोत्साहन केले. त्यामुळे राज्यात महिलांच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र पहावयास मिळाले. लाडक्या बहिणींनी महायुतीला जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेवर बसविले आहे. मात्र त्याच लाडक्या बहिणींच्या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर नव्याने नोंदणी करून नव्या अटींची पूर्तता करावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.  या डिसेंबरमध्ये महिलांना १५०० मिळणार की २१०० रुपये मिळणार याबाबत अजूनही संभ्रम आहे


विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रुपये देऊन आत्मनिर्भर करण्यास प्रोत्साहन दिले. याचा फायदा राज्यातील २ कोटींपेक्षा जास्त महिलांनी घेतला असून अनेकांच्या बॅंक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली आहे.  मात्र या योजनेच्या लाभापासून अनेक महिला वंचित राहिल्याचे देखील पहावयास मिळत आहे. अनेक महिलांनी योजनेचे अर्ज भरून त्याचबरोबर सर्व निकष पास करत त्यांना अर्ज मंजूर झाल्याचे संदेश देखील प्राप्त झाले आहेत मात्र त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक ही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे आपल्याला या योजनेचा फायदा होणार की नाही या संभ्रमात अनेक महिला असल्याचे दिसून येत आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा करत अनेक महिलांनी आपल्या लाडक्या भावाच्या हातात पुन्हा सत्ता सोपवली आहे. मात्र निवडणुकीत सर्वाधिक मत मिळवल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपदाचा दावा केल्याचे म्हटले जात आहे. त्यातच एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी लाडक्या बहिणींची इच्छा असल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार असे चित्र दिसून येत आहे.  मात्र, महायुतीच्या नवीन सरकारमध्ये या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता आहे. तर या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या योजनेच्या रकमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.


सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले होते. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. या डिसेंबरमध्ये महिलांना १५०० मिळणार की २१०० रुपये मिळणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ठरलेल्या लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यायचे झाल्यास राज्याच्या तिजोरीवर ५५ हजार कोटींचा भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या महिलांच्या एकत्रित योजनांवर ९० हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती राज्यावर येणार असून, नव्या सरकारसमोर आर्थिक ताळेबंदाचे मोठे आव्हान असणार आहे.


या योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या होत्या. त्यात लाडकी बहीण योजनेची भर पडली. त्यामुळे लोकप्रिय खर्चाच्या योजना सरकारला परवडणार्‍या नसल्याने सध्या पात्र ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींपैकी ५० टक्के लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सर्व लाभधारक महिलांचे अर्थकारण तपासले जात असल्याची चर्चा आहे.


ज्या करदात्या महिला आहेत त्या पहिल्या टप्प्यात वगळल्या जातील. त्यांनतर एकूण उत्पन्नगटाच्या निकषात लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची एकूण आथिक स्थिती तपासली जाईल. त्यातून आणखी लाडक्या बहिणी वगळल्या जातील आणि सध्या होत असलेल्या खर्चामध्ये ५० टक्के कपात केली जाईल असे सांगितले जात आहे.राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहेत.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)