अखंड वाचन यज्ञाचे बिगुल वाजले
डोंबिवली ( शंकर जाधव ) : माझा व्यवसायात वाचण्याला फार महत्व आहे. कारण कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना मला वाचावे लागते. मग ते पुस्तक असो , स्क्रिप्ट असो वा माणूस असो. त्या वाचनातून मी व्यक्तिरेखा साकारली जात असते. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करा पण त्यासाठी आधी वाचन महत्त्वाचे आहे. वाचन तुम्ही कसेही करू शकता , कोणत्याही माध्यमातून करू शकता , कोणत्याही प्रकारे करू शकता. फक्त काय वाचायचे हे तुम्हाला कळले पाहिजे " असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी अखंड वाचन यज्ञाचे उद्घाटन प्रसंगी केले.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे वतीने आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, इनर व्हील क्लब ऑफ कल्याण आणि बालक मंदिर संस्था यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सलग ५० तास अखंड वाचन यज्ञाचे प्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की " असं ऐकलं होतं की पुराणकाळात काहीतरी कोणाला तरी प्राप्त व्हावे मग ते राज्य असो, संपत्ती असो वा युद्ध जिंकणे असो यासाठी यज्ञ केला जात असे , पण डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून समाजाच्या व भावी पिढीच्या उन्नतीसाठी हा वाचनाचा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे हे खरोखरच खूप महान काम आहे. असा यज्ञ पुराणकाळात सुद्धा झाला नसेल.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रेरणा रायचूर यांनी वाचनाचे महत्त्व सांगून उपक्रमाचे कौतुक केले.अखंड वाचन यज्ञाचे उद्घाटन प्रसंगी बालक मंदिर संस्था व कॅप्टन रमाकांत ओक हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आले. ओक हायस्कूल शाळेचा अंध विद्यार्थी सुश्रुत कुलकर्णी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. दिनेश मेहता आणि इनर व्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन प्रेरणा रायचूर यांचे हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथ दिंडीची सुरुवात करण्यात आली. कल्याणातील शिवाजी चौक येथून सुरुवात झालेली ही ग्रंथ दिंडी बालक मंदिर येथील जयवंत दळवी वाचन नगरी येथे येऊन त्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते डॉ वीणा देव वाचन कट्टा आणि सुधाताई करमरकर वाचन कट्टा यांचे उद्घाटन करण्यात आले. *कार्यक्रमाचे सुरुवातीला अंध विद्यार्थी सुश्रुत कुलकर्णी (ओक स्कूल ) याने ब्रेल* मधून वाचन करून सर्वांना नवी दृष्टी दिली. त्यानंतर मयुरेश गद्रे, डॉ सुश्रुत वैद्य , नमिता भिडे , डॉ योगेश जोशी यांनी वाचन करून उपक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी हेमंत नेहते यांचे गोष्ट छोटी प्रेरणा मोठी आणि श्रीकृष्ण काळकर यांचे पानवाला हे पुस्तक मान्यवरांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले.
मराठी वाचन संस्कृतातील महत्वाचा टप्पा असलेल्या दिवाळी अंकांच्या स्पर्धेतील भावार्थ ( प्रसाद मिरासदार) , चांगुलपणाची चळवळ ( शुभांगी मुळे), वयम् ( श्रीकांत बापट) , हॅशटॅग ( पुंडलिक पै) या दिवाळी अंकांचा अक्षरगंध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच लेखन व वाचन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉ सुनीलकुमार सरनाईक , डॉ दिनेश गुप्ता आणि डॉ सुनील खर्डीकर यांचा अक्षरगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर उपक्रमाचे आयोजन हेमंत नेहते ( अक्षरमंच प्रतिष्ठान) , डॉ अर्चना सोमाणी , ( इनर व्हील क्लब ऑफ कल्याण) , बिजू उन्निथन ( रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण), डॉ सुश्रुत वैद्य , नमिता भिडे ( प्रकल्प प्रमुख) यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी आणि आभार प्रदर्शन बिजू उन्निथन यांनी केले. उपक्रमासाठी अक्षरमंच नाशिक अध्यक्षा आरती कुलकर्णी , रोटरीचे रमेश मोरे, बालक मंदिरचे भालचंद्र घाटे , हायमीडिया लॅब , रेगे दीक्षित क्लासेस , कल्याण नागरिक , जोशी फायनान्शिअल , खर्डीकर क्लासेस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.