रोहित पाटील, सुहास बाबर यांना पहिल्याच प्रयत्नात यश
सांगली, ( वैभव पतंगे ) : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तासगाव- कवठेमहांकाळमधून रोहित पाटील, खानापूर-आडपाडीतून सुहास बाबर यांना पहिल्याच प्रयत्नात आमदारकीची लॅाटरी लागली. तर जतमधून गोपीचंद पडलकर व शिराळामधून सत्यजित देशमुख यांच्या बर्याच दिवसाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. यंदा जिह्याच्या राजकारणात चार नव्या चेहर्यांना जनतेने संधी दिली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे तोंड पहावे लागले. सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील चार आमदारांचे चेहरे नवीन आहेत. तर चार विद्यमान आमदारांना जनतेने पुन्हा संधी दिली आहे. इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजयाचा डबल चौकार मारला तर मिरज मतदारसंघातून डॉ. सुरेश खाडे यांनी चौकार खेचला. सांगलीतून आमदार सुधीरदादा गाडगीळ व पलूस-कडेगाव मतदारसंघातून आमदार विश्वजित कदम यांनी विजयाची हॅॅॅट्ट्रीक केली आहे.
विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याची अनेकांची इच्छा असते. यासाठी कार्यकर्त्यांला तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणे महत्वाचे असते. व्यापक जनसंपर्क असणे गरजेचे असते. आपली भूमिका मतदारांना पटवून द्यावी लागते. यासाठी बर्याच दिवसांचा कालावधी जातो. अनेकांना तर मोठ्या परिश्रमानंतर यश मिळत नाही. पण पराभवाने खचून न जाता पुन्हा श्रीगणेशा केला जातो. मात्र काही जणांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळून जाते. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेेल्या सुहास बाबर यांना यश मिळाले. या मतदारसंघात स्व. आ. अनिल बाबर यांनी अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. मतदार संघाच्या पाणीप्रश्नी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यामुळेच आज टेंभू योजनेचे पाणी या मतदार संघात दाखल झाले आहे. याचा फायदा सुहास बाबर यांना या निवडणुकीत झाल्याचे पाहावयास मिळाले.
संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असलेल्या तासगाव-कवठे महांकाळमध्ये आमदार रोहित पाटील यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. या मतदासंघात आर. आर. आबा गट व माजी खासदार संजयकाका गट अशीच पारंपारिक निवडणूक पार पडली. या मतदार संघात स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी केलेले कामे, आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांनी जोडून ठेवलेले कार्यकर्ते व कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांची मिळालेली साथ यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. त्याचबरोबर शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांचा वनवास अखेर संपला आहे. सुमारे तीस वर्षाचा संघर्षाला पुर्णविराम देत अखेर त्यांनी विजयश्री खेचून आणला आहेे. या विजयात सम्राट महाडिक हे किंगमेकर ठरले. अटी-तटीच्या या निवडणुकीत अखेर नाईक गटाच्या सत्तेला सुरूंग लावत सत्यजित देशमुख यांनी विधानसभा गाठली.
निवडणूक कोणतीही असो भल्याभल्यांना धक्का देणार्या जत मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर तब्बल ३८ हजार मतांनी विजयी झाले. जत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्या गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षाला येथील जनतेने साथ देत आमदार बनविले. प्रस्थापितांच्या विरोधात टोकाचा संघर्ष करणार्या आ. गोपीचंद पडळकर यांना अनेक पराभव पचवावे लागले. परंतु जतमध्ये ही मालिका खंडीत झाली. दोनवेळा लोकसभा, दोन वेळा विधानसभा, एकवेळ जिल्हा परिषद अशा पाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण या निवडणुकीत जतमध्ये येवून त्यांनी विकासाचा विश्वास दिला आणि जतकरांनीही साथ दिली.
मंत्रीपद कोणाला?
सांगली जिल्हयातून मंत्रीपदसाठी विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे, सुधीरदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत. गत मंत्रीमंडळात खाडे यांच्या रूपाने केवळ एका आमदाराची वर्णी लागली होती. यंदा मात्र जिह्यातून चार नावे चर्चेत असल्याचे मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
रोहित पाटील सर्वात तरूण आमदार
यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या विधिमंडळात निवडून जाणार्या आमदारमध्ये २५ वर्षांचे रोहित पाटील हे सर्वात तरूण आमदार ठरले आहेत. रोहित पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे.