कल्याण: नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने गेला आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी मेळावे, प्रभात फेरी, एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन जागरूकता अभियान, शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती संबंधित प्रबोधन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याची सांगता गुरुवारी कल्याण पूर्व (चिंच पाडा ) येथील साकेत कॉलेज येथील कॉलेजचे प्राचार्य, उप प्राचार्य यांच्यासह नागरी संरक्षण संघटनेचे उपनियंत्रक व उपमुख्य क्षेत्ररक्षक यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी दुर्घटना निवारण तथा उंच इमारतीमधून विमोचन यांच्या प्रात्यक्षिकांसह करण्यात आले.
नागरी संरक्षण संघटनेच्या वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांना संघटनेचे कार्य आणि महत्त्व पटवून देतानाच संघटनेचे स्वयंसेवक प्रत्यक्ष आपत्तीचे वेळी कशाप्रकारे आपत्तीग्रस्त बाधित रुग्णांचे उपलब्ध साधनांचा वापर करून सुरक्षित जागी स्थलांतर करतात. तसेच उंच इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी विमोचन कार्य कशाप्रकारे केले जाते याचे अतिशय उत्कृष्ट असे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. उंच इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी चे प्रात्यक्षिक उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी आणि विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने केले.
याप्रसंगी बोलताना उपनियंत्रक विजय जाधव यांनी सर्व स्वयंसेवकांना नागरी संरक्षण वर्धापन सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना संघटनेचे सभासद होवून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे साकेत कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत भर्हाटे यांनी देखील आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सदर आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन करून अशा प्रकारच्या लोकोपयोगी प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या कॉलेजच्या जागेचा वापर करण्यास नेहमीच उपलब्ध असेल असे आश्वासन दिले. तसेच या महाविद्यालयात सध्या नागरी संरक्षण संघटनेचे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग चालू असल्याचेही सांगितले. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नागरी संरक्षण संघटनेचे सर्व मानसेवी अधिकारी व स्वयंसेवकांचे शाल व गुलाब पुष्प देवून स्वागत व अभिनंदन केले. त्याचप्रमाणे नागरी संरक्षण संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी यांनी कॉलेज च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन गरज, महत्त्व आणि आवश्यकता याबाबत माहिती दिली तसेच कशाप्रकारे हे प्रशिक्षण घेता येईल व त्याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होईल हे देखील सांगितले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यामधे उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव आणि कल्याण पूर्वचे विभागीय क्षेत्ररक्षक सगीर खान यांनी विशेष मेहनत घेतली आणि त्यांना विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा-हनुमान चौधरी व विभागीय क्षेत्ररक्षक कल्याण पश्चिम शकुंतला राय यांनी सहकार्य करून प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सुरळीतपणे पार पाडले.