रायगड, ( धनंजय कवठेकर ) : जे. एस. डब्लू फाऊंडेशन मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील मुरुड,अलिबाग व पेण या तीन तालुक्यामधील २१ शाळा व २० ग्रामपंचतीमध्ये गेली पाच वर्ष हा प्रकल्प राबविला जात होता. सदर प्रकल्पामध्ये इयत्ता सहावी ते दहावीचे सुमारे ३२०० विद्यार्थी विविध जीवन कौशल्य, अंकगणित व भाषाज्ञानाचे प्रशिक्षण घेत होते.
या प्रोजेक्टचे काम व यश पाहता हा प्रोजेक्ट पुन्हा नव्याने ५ वर्षासाठी सुरू करण्यात येत आहे. त्या निमित्ताने प्रोग्राम लॉन्च इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. पोयनाडमधील हॉटेल पाटील ब्रदर्समध्ये हा सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे. एस. डब्लूच्या सविता मुंढे, हेड ऑफ एज्युकेशन मुंबई, सुधीर तेलंग, हेड, सी. एस. आर. डोळवी, किरण म्हात्रे , एक्झिक्युटिव्ह, आकृती मनचंदा, सी. आर. एम. मॅजिक बस, डॉ प्रगती पाटील, विभाग समन्व्यक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थीत होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत आणि ओळखीचा कार्यक्रम झाल्यावर प्रास्ताविकातून कार्यक्रमाची ओळख करून देण्यात आली. त्यांनतर पीपीटी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून प्रगती पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या कामाचा आढावा घेतला व दुसऱ्या presentation मधून नव्याने सुरू केलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली. या दरम्यान विद्यार्थ्यांबरोबर चालणाऱ्या सेशनची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी एक डेमोंसेशन घेण्यात आले. यामधे सर्वांनी खूप आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला.
त्यांनतर कार्यक्रमात उपस्थित नवीन व जुन्या प्रकल्पाचे अनुभव शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी इत्यादी मान्यवरांनी सांगितले. यात त्यांनी प्रोजेक्टसाठी सहकार्य देऊ असे प्रतिपादन केले. सविता आणि सुधीर यांनी आपल्या वक्तव्यात विद्यार्थी, पालक व शाळा आणि गाव यांच्या एकत्रित काम करण्याच्या मुद्यावर भर दिला. जे. एस. डबल्यूतर्फे उपलब्ध सुविधांनी आपण गावाच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करू असे सांगितले.
या कार्यक्रमात गॅलरी वॉक म्हणून मागील प्रकल्पातील गोष्टींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, त्यामधून केलेल्या कामाचा व वापरण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्यांची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगोत्री पाटील, प्रास्ताविक मीनल धुमाळ, व आभार प्रदर्शन मेघा कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसच्या डॉ. प्रगती पाटील, पूजा म्हात्रे व सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.