महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन
डोंबिवली, ( शंकर जाधव) : संविधानाच्या अमृत महोत्सावानिमित्त "घर घर संविधान" उपक्रम शाळा, महाविद्यालयात राबविणार आहोत जेणेकरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा, त्यांचे कार्य याची जनमानसात अधिकाधिक जनजागृती होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून आदरांजली वाहताना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी हे प्रतिपादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आज त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कल्याण (प.) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समयी माजी महापौर रमेश जाधव, महापालिकेचे सर्व उपायुक्त तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.
कल्याण (पूर्व) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभागक्षेत्र कार्यालय, ५/ड प्रभाग परिसरातील "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांचे पुतळ्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त-१ हर्षल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यासमयी माजी पालिका सदस्य महेश गायकवाड, ५/ड प्रभागाचे सहा.आयुक्त, इतर अधिकारी/कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.
डोंबिवली (पूर्व) येथील जुन्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळील "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांचे पुतळ्यास आणि ६/फ प्रभाग कार्यालयातील "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांचे तैलचित्रास महापालिका अतिरिक्त आयुक्त-२ योगेश गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यासमयी आमदार राजेश मोरे, ६/फ, ७\ह, ८/ग प्रभागांचे सहा.आयुक्त तसेच इतर अधिकारी/कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.