ठाण्यात रंगला पुरस्कार सोहळा
ठाणे, ( रिना सावर्डेकर) : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील वर्षापासून या पुरस्काराबरोबरच आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली.
भाजप शिक्षक आघाडी-कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यातील एम. एच. हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी गटनेते मनोहर डुंबरे, कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, जनरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र रजपूत, समन्वय प्रतिष्ठानच्या संचालिका नीलिमा डावखरे, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, शेखर कुलकर्णी, एन. एम. भामरे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
कोकणातील उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून ठाणे येथील मावळी मंडळ, पालघर जिल्ह्यातील अरविंद स्मृती, मुरबाडमधील न्यू इंग्लिश स्कूल, नवी मुंबईतील शेतकरी शिक्षण संस्था, डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था, तारापूर एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, सिंधुदुर्गातील कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था, कल्याण पूर्व येथील आदर्श शिक्षण मंडळ, भिवंडीतील पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळ, कल्याण येथील नुतन शिक्षण संस्था यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
कोकणातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेत कायम अव्वल क्रमांक राखला. दहावीच्या परीक्षेत कोकणातील विद्यार्थ्यांचा राज्यात सर्वाधिक निकाल असून, त्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. पुढील पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडीकडून होणारा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न विधीमंडळात मांडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार केळकर यांनी दिली.
विधान परिषदेचे माजी उपसभापती स्व. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्ठाचालकांचा सन्मान करताना आनंद होत आहे. भारताच्या भविष्यासाठी कार्यरत असलेल्या गुणवंत शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमाची परंपरा २०१८ पासून सुरू झाली. सुरुवातीला शिक्षक व संस्थाचालकांपाठोपाठ यंदाच्या वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात आहे. तर पुढील वर्षापासून आदर्श शाळांना पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा स्वागताध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या वेळी काही पुरस्कारविजेत्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केला. तसेच या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाली असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले.