समाज विकास विभागाच्या उपायुक्तांनी साधला किन्नर पंथीयांशी संवाद
कल्याण, ( शंकर जाधव) : किन्नर समुदाय हा समाजातील एक दुर्लक्षित, उपेक्षित समाज आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी शनिवारी अस्मिता किन्नर संस्थेच्या कल्याण पूर्व येथील कार्यालयास समक्ष भेट देऊन तेथील किन्नर पंथीयांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि समाजातील या दुर्लक्षित घटकास मुख्य प्रवाहात आणून मानसन्मानाने जगण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत किन्नर पंथाच्या गुरू नीता केणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
किन्नर पंथीयाची प्रथम महापालिकेकडे नोंदणी करून त्यांचे मनोगत ,त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्यासाठी प्रथमतः महापालिकेच्या नाट्यगृहात किन्नर महोत्सव आयोजित केला जाईल,किन्नर पंथीयांचे बचत गट तयार करून त्यांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देऊन उदर निर्वाहासाठी मार्केट उपलब्ध करून त्यांच्या उपजीविकेसाठी महापालिकेमार्फत सहकार्य केले जाईल असे आश्वासन उपायुक्त संजय जाधव यांनी यावेळी तेथे उपस्थित असलेल्या किन्नर पंथीयांना दिले.
किन्नर समुदायाने महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन महापालिका करीत असलेल्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले आणि महापालिका आयुक्त स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी वेळ मागितली आहे . आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच किन्नर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

