एकूण २० शाळांचा पुढाकार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : पर्यावरण दक्षता मंडळ, कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी आणि नॅशनल उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “सिटी कल्याण निसर्गमेळा २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विविध शाळेतील ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ८ वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमागचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण शिक्षण देणे व त्याच बरोबर जनजागृती घडवणे होता. २० शाळांमधून एकूण ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
मेळाव्यात सुभेदार वाडा शाळा, शारदा मंदिर शाळा, शिशुविकास बेतूरकर पाडा, आंबेडकर रोड, श्री गजानन विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक, के. सी. गांधी शाळा, बालक मंदिर इंग्लिश, श्री वाणी विद्याशाळा, गायत्री माध्यमिक शाळा, नूतन ज्ञान मंदिर, आश्रय फौंडेशन काळसेकर हायस्कूल, ओल्ड बॉइज असो. इंग्लिश शाळा, मोहमदीया शाळा, नरेंद्र कान्वेंट स्कूल, स. ब. दिव्य शाळा, अभिनव विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल इतर एकूण २० शाळांमधून एकूण ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
३ डिसेंबर: भोपाळ वायु दुर्घटना या दिवसाची स्मृतिप्त्यर्थ या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्या सहकार्याने हवा प्रदूषण तपासणीची मोबाइल व्हॅन उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी मातीपासून विविध आकाराचे भांडे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या निसर्गमेळ्यामध्ये झाडे ओळखा स्पर्धा, निसर्ग छायाचित्रण स्पर्धा, भित्तिचित्र स्पर्धा, इंधन विरहित पाककृती, कापडी पिशवीवर चित्र काढणे, टाकाऊ पासून टिकवू, पर्यावरण गीत आणि पथनाट्य अशा एकूण 8 स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धांसाठी तज्ज्ञ व मान्यवर परिक्षकांचे सहकार्य लाभले. कल्याण - डोंबिवली परिसरातील १४ तज्ज्ञ मंडळींनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले. रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी तर्फे सर्व विजेत्या स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे पर्यावरण प्रदर्शनी आणि पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन सादर करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटीच्या अध्यक्षा रो. हायसिंथ बेटासिवाला, रो. याकुब बेटासिवाला (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर), रो. अब्दुल्ला खान (प्रोजेक्ट चेअर, नॅशनल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक) रो. निखिल परमार (सचिव, रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी) तसेच अनेक मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते. पर्यावरण दक्षता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वालावलकर यांनी याप्रसंगी अशा स्पर्धा ही विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याकडे पोहोचण्याचे एक माध्यम असून मूळ उद्देश पर्यावरण शिक्षण घरोघरी असा असून विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा उद्देश सफल होताना दिसत आहे. पर्यावरण दक्षता मंडळ कडून अनेक स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
नॅशनल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक तसेच त्यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांनी खूप सहकार्य केले. पर्यावरण दक्षता मंडळातर्फे ग्रीन शॉपी या पर्यावरण पूरक उत्पादनांचा स्टॉल लावण्यात आला होता. जास्तीत जास्त सहभाग नोंदवणारी आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवणा-या आसरा फाऊंडेशन कालसकर शाळेला ग्रीन स्कूल ट्रॉफी प्रदान करण्यात आली.पर्यावरण दक्षता मंडळातर्फे समीक्षा चव्हाण, हेमांगी सामंत, आदित्य कदम आणि रूपाली शाईवाले यांनी या कार्यक्रमाचे नियोजनकेले होते.