मुंबई: "प्रत्येकाने मुंबई आणि भारतासाठी खेळण्याचे ध्येय बाळगा आणि त्यादृष्टीने आपल्या खेळावर मेहनत घ्या" असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले. प्रत्येकी ३५ षटकांच्या या स्पर्धेत अंतिम फेरीतील एका शतकाचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना शतक झळकावता आले नाही याबद्दल मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एम.सी. सी. ठाणे आणि एम.सी.सी. कलिना हे ज्वाला सिंग यांचेच दोन्ही संघ खेळत होते हे पाहून वेंगसरकर यांनी प्रशिक्षक म्हणून ज्वाला सिंग आपल्या संघातील मुलांवर घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या स्पर्धेत एम.सी.सी. ठाणे संघाने एम.सी.सी.कलिना संघावर ३३ धावांनी मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या एम.सी.सी. ठाणे संघाने निर्धारित ३५ षटकांत ७ बाद २२१ धावांचे लक्ष्य उभारले. यात स्मिन किणी (११०) याने ११५ चेंडूत शतकी मजल मारताना १२ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याने आदित्य व्ही. एस. (२५) यासह तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची तर सुधांशु पाल (२२) याच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भर घातली. या आव्हानाचा पाठलाग करताना एम.सी.सी. कलिना संघाचा कर्णधार आनंद तिवारी (७१), निसर्ग चौधरी (२०), ज्ञान कृष्णा प्रसाद (२७), अहान सूतरन (३१) आणि अफसर अहमद (२१) यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण त्यांना ७ बाद १८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. देवांश शिंदे (२७ धावांत ३ बळी) आणि स्मिन किणी (२४ धावांत ३ बळी) यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत आपल्या संघाचा विजय निश्चित केला.
अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या स्मिन किणी यालाच अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. धीरज राऊत (३ सामन्यात २५५ धावा) याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर निसर्ग चौधरी याला (४ सामन्यात ९ बळी) सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून देवेंद्र शर्मा (पटेल सी.सी.) याची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि मुंबई महानगर पालिकेचे असिस्टंट कमिशनर सुधीर नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.