माजी आमदार नरेंद्र पवार यांनी न्यायालयाच्या निकालानंतर दुर्गादेवीचे दर्शन घेत केली आरती
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दुर्गाडी किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. कल्याण न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेत आरतीही केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणच्या ऐतिहासिक नगरीचे सांस्कृतिक वैभव म्हणून दुर्गाडी किल्ला आणि इथल्या दुर्गादेवीची ओळख आहे. त्यासंदर्भातील शासकीय दस्तावेज आणि अनेक इतिहासकारांच्या नोंदी असतानाही साडेचार दशकांपूर्वी किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात दावा करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची असल्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे गेली चार दशके इथल्या हिंदूंच्या वाहीवाटीसाठी अनेकांनी दिलेला लढा, समर्पण आणि त्याग खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असल्याची भावनाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हा सहकार्यवाह बुद्धीप्रकाश मित्तल, प्रतापनगर कार्यवाह प्रविण शिंपी, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, राणी कपोते तसेच सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते.