अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांचे प्रतिपादन
कल्याण, ( आरती परब) : ऊर्जेची बचत ही सद्यस्थितीत काळाची गरज बनली असून ऊर्जा संवर्धनासाठी महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी केले. विद्युत विभागामार्फत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभ समयी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ऊर्जा संवर्धन म्हणजे जबाबदारीने ऊर्जेचा वापर करणे होय. भारतातील ७० टक्के वीज निर्मिती ही कोळशापासून होते आणि आता कोळशाचे आयुष्यमान सर्वत्र कमी होत आहे. त्यामुळे पुढील पिढीसाठी हे नैसर्गिक स्त्रोत जतन करावयाचे असतील तर ऊर्जा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने उचलली पाहिजे. तरी आवश्यकता नसताना विजेचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी या समयी केले.
संपूर्ण देशभरात १४ डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन तसेच १४ ते २० डिसेंबर या कालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जातो. महापालिकेच्या विद्युत विभागाकडूनही दरवर्षी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यात आली. या ऊर्जा संवर्धन सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाकडून तीन आकर्षक माहिती पत्रके तयार करण्यात आली आहेत. यापुढील आठवडाभर देखील विद्युत विभागाकडून कल्याण- डोंबिवलीतील विविध सार्वजनिक ठिकाणी आणि गृहसंकुलात ऊर्जा संवर्धन आणि बचतीबाबत जनजागृती केली जाणार आहे.
यावेळी विद्युत विभागाबाबत तयार करण्यात आलेल्या आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आणि ऊर्जा बचत आणि संवर्धनाची शपथ महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसिडर आणि महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे डॉ. प्रशांत पाटील, न्यू रोटरी क्लब कल्याणचे बिजू उन्नीथन, महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.