अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करा



ठाण्यात शिव, फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांची मागणी 

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

ठाणे, ( रिना सावर्डेकर ) : सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे, या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचे आंदोलन सुरूवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल, असा इशारा दिला.





परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती. त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी, `आंबेडकर ही फॅशन झाली आहे,' असे विधान केले होते. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील 72 बुद्धविहारांशी संबधित लोक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे प्रतिनिधी तसेच दिव्यांग देखील सहभागी झाले होते. यावेळेस मोर्चेकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राष्ट्रपिता जोतिराव फुले यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, झिंदाबाद, झिंदाबाद संविधान झिंदाबाद, जब तक सुरज चाँद रहेगा... बाबा तेरा नाम रहेगा, सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे,  राजीनामा द्या.. अमित शहा राजीनामा द्या, हर जोर जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जय जय जय जय भीम... जय भीम, जय भीम अशा घोषणा दिल्या.



या मोर्चात ठामपा मा. स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे, मा. परिवहन समिती सभापती जितेंद्रकुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, गोविंद पठारे, प्रल्हाद मगरे, जयवंत बैले, शंकर जमदाडे, समाधान तायडे, राहुल घोडके, लोभसिंग राठोड, विशाल ढेंगळे, बाबासाहेब येडेकर, डॉ. प्रमोद जाधव, प्रमोद इंगळे, सुरेश कांबळे, अशोक कांबळे, प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, तात्याराव झेंडे, विमलताई सातपुते, सारिका ब्राम्हणे, सुमन
 इंगळे, दैवशाळा हराळे आदींसह हजारो शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.





या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की, अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल, असे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post