उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी



तीन राष्ट्रीय महामार्गांसह १७४ रस्ते बंद

नवी दिल्ली :  उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आहे. हिमवृष्टीमुळे हिमाचलमध्ये तीन राष्ट्रीय महामार्गांसह १७४ रस्ते बंद करण्यात आले आहेत.  त्यामुळे मनाली, रोहतांग आदी मार्गांवर ३०० बससह सुमारे १००० वाहने अडकून पडली.  अटल बोगद्याजवळ सुमारे ४००० पर्यटक अडकले आहेत.  ख्रिसमस साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक येथे दाखल झाले असताना राज्यातील अनेक भागातील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.




हिमाचलच्या मनाली, कुफरी, केलॉन्ग, डलहौसी आणि शिमला येथे १० ते १५ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली. हवामान खात्याने गुरुवारपर्यंत बिलासपूर, उना, हमीरपूर आणि मंडी येथे तीव्र थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात तापमान उणेपर्यंत घसरले आहे. श्रीनगरमधील दल तलावाबरोबरच नळांमध्येही पाणी गोठले आहे. उत्तराखंडमधील उंच भागातही बर्फवृष्टी होत आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि कुमाऊंमधील हेमकुंड साहिब आणि मुन्सियारी येथे नवीन हिमवृष्टी झाल्याने राज्यभरात थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 




Post a Comment

Previous Post Next Post