अज्ञात इसमावर तसेच शाळा संचालकावर गुन्हा दाखल
दिवा ( आरती परब) : शहरातील स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हाय स्कूल या शाळेतील पाचवीतील विद्यार्थिनीवर पंचवीस वर्षीय नराधमाने अश्लील चाळे करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याला मुलीने विरोध करत आरडाओरड केली असता वर्गशिक्षिका धावून येताच सदर इसमाने तेथून पळ काढला. याप्ररणी शाळा व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न करता मुलीला घरी पाठवून हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मुलीचे पालक शाळा व्यवस्थापनाकडे माहिती घेण्यासाठी आले असता शाळेमध्ये सीसीटीव्ही सुरू आहेत, आम्हाला त्याची फुटेज माहिती देण्याची मागणी केली. त्यावर शाळा व्यवस्थापनाने झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नका, असा दम वजा इशारा दिला व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पोलीस प्रशासनाने सदर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच शाळा संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी मेहेत्रे तसेच गटप्रमुख सारंग हे ही यावेळी शाळेत उपस्थित होते. याप्रकरणी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी शिक्षणाधिकारी मेहत्रे यांच्याकडे शाळेवर कठोर कारवाई करून शाळेला टाळे ठोकण्याची मागणी केली. सोबत शहर समन्वयका प्रियांका सावंत, उपशहर संघटीका स्मिता जाधव, विभाग प्रमुख राजेश भोईर, शाखा संघटीका पूजा आग्रहरी, उपशाखा प्रमुख संतोष कदम, शिवसैनिक नितीन सावंत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.