हैदराबाद: हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वास्तविक, अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर 'पुष्पा २' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्कंठा होती. पुष्पा २ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबतची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची प्रेक्षक वाट पाहत होते. चाहत्यांचा क्रेझ पाहता पुष्पा २ या चित्रपटाचा प्रीमियर मध्यरात्री हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्वतः हैदराबादच्या आरटीसी क्रॉस रोड येथील संध्या थिएटरमध्ये दाखल झाले होते.
यावेळी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे दाखल झाले होते. अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. त्यासाठी प्रशासनाने सौम्य लाठीमारही केला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले.
दिलसुखनगर येथे राहणारी रेवती पती भास्कर आणि त्यांची दोन मुले श्री तेज (९) आणि सान्विका (७) यांच्यासोबत 'पुष्पा २' चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आले होते. गर्दी गेटमधून ढकलत असताना, रेवती आणि तिचा मुलगा श्री तेज बेशुद्ध पडले. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'पीडित ३९ वर्षीय महिला थिएटरमध्ये बेशुद्ध पडली होती आणि तिला उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी तेज याला उपचारासाठी बेगमपेट येथील KIMS रुग्णालयात हलवण्यात आले. एका बालकासह अन्य जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रेवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयातून गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे.