मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित आमदार रवींद्र चव्हाण यांचे गीत व्हायरल
ठाणे, ( दिलीप कालेकर ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. "मुख्यमंत्री कोण होणार?" हा १० दिवसांपासून ताणला गेलेला प्रश्न अखेर संपला असून महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. त्यानंतर फडणवीस यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. या धामधुमीत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या गोटातील सहकारी भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांचे अभिनंदन करणारे एक गाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केले आहे.
यामध्ये फडणवीस यांच्या विविध गुणधर्मांचे वर्णन करण्यात आले असून या गाण्याच्या व्हीडीओमधून फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. याविषयी आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता "देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजपचा अन्य कोणी नेता असो, जे बोलतो ते करून दाखवतोच. "नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन" हे वचन देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिले होते, हे वचन आज सत्यात उतरले आणि आता देवेंद्रपर्वाला एक नवीन सुरुवात झाली आहे. येत्या ५ वर्षांत फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार एकसंध आणि कटिबद्ध राहून महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
