अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक अरविंद जगताप, इत्यादी मान्यवरांचा सहभाग
अलिबाग ( धनंजय कवठेकर) : परिसरातील नवयुवक नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन करणार आहेत. विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी आयोजित वेध अलिबाग ‘रंग-उमंग’ या कार्यक्रमांतर्गत भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, “चला हवा येऊ द्या" चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळया सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारदांच्या मुलाखती विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी घेणार आहेत.
डॉ आनंद नाडकर्णी यांची इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) , ठाणे तर्फे महाराष्ट्रातील विविध शहरांत स्थानिक संस्थांच्या सहयोगाने वेध कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबागच्या विद्यमाने गेल्या वर्षी प्रथमच वेध-अलिबागचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी १४ जानेवारी रोजी आरसीएफ कम्युनिटी हॉल मध्ये झालेल्या वेध - घेऊ भरारी या वेधच्या कार्यक्रमात अंध व्यावसायिक सागर-नेत्रा पाटील, पर्यावरणस्नेही उद्योजिका अमिता देशपांडे, इंफ्ल्यूएन्सर रानमाणूस प्रसाद गावडे, लेकमॅन आनंद मल्लिगवड आणि ऑस्कर नामांकित आर्ट डायरेक्टर दिलीप मोरे यांच्या मुलाखती डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या होत्या. या मातब्बर व्यक्तिमत्वांचा विलक्षण जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून अनुभवताना अलिबागेतील शेकडो युवक युवती सकाळी १०.३० पासून संध्याकाळी ४.३० पर्यंत जागेवर खिळून होते.
वेध-अलिबाग २०२५ ची थिम आहे "रंग-उमंग". विविध क्षेत्रातील आगळयावेगळ्या व्यक्तिमत्वांच्या जीवनप्रवासाचे रंग उलगडत असताना त्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागची ऊर्जा, उत्साहाचे (उमंग) स्रोत डॉ. नाडकर्णी यांच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी अलिबाग परिसरातील नवयुवक वेध-अलिबाग २०२५ रंग-उमंग कार्यक्रमात पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी निश्चितच उत्सुक असतील. या कार्यक्रमदरम्यान डॉ. आनंद नाडकर्णी ज्यांची मुलाखत घेणार आहेत त्यांचा थोडक्यात परिचय
१. मीरा बोरवणकर : भूतपूर्व आय पी एस अधिकारी मिरा चढ्ढा बोरवणकर मूळच्या पंजाबच्या. भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमी मधून पदवी प्राप्त करणाऱ्या त्या १९८१ च्या बॅच मधील एकमेव महीला. त्यांचं शालेय शिक्षण फाजिल्कामध्ये झालं. जालंधर डी ए व्ही महाविद्यालयामधून इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.पुणे विद्यापीठमधून कायद्याचे शिक्षण घेतले आणि संस्थापक व्यवस्थापन (founder management) मध्ये पीएचडी पूर्ण केली. त्या अमेरिकेच्या मिनेसोटा ह्युबर्ट एच हम्फ्री शिष्यवृत्तीच्या मानकरी आहेत.संस्थापक बांधणी गुन्हेगारी तपास कायदा आणि प्रशासन यामध्ये विशेष अभ्यास आहे. त्या मुंबई गुन्हे शाखेच्या सहआयुक्त, पुण्याच्या पोलीस आयुक्त, तसेच महाराष्ट्र तुरुंग विभागाच्या प्रमुख होत्या, त्यांना वैशिष्ठ्य पूर्ण आणि गुणवत्ता पूर्ण सेवे साठी भारताच्या राष्ट्रपतीच्या पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना मिनेसोटा विद्यापीठ कडून अतुलनीय नेतृत्व पुरस्कार बरोबर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
२. चिन्मय गवाणकर: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कम्पनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे कंट्री डायरेक्टर. व्हीजेटीआयचे अभियांत्रिकी पदवीधर असलेले चिन्मय गवाणकर यांनी मायक्रोसॉफ्ट, गुगल, आयबीएम, SAP, टाटा अशा नामांकित आस्थापनांमध्ये डेटा अनॅलिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली आहे. या विषयांवर मोठ्या उद्योगांना तसेच देशभरातील उदयोन्मुख व्यवसायांना सल्ला देण्याचा २३ वर्षांहून अधिक वैविध्यपूर्ण अनुभव आहे. त्यांचे विज्ञान ,तंत्रज्ञान ,करियर मार्गदर्शन आणि सामाजिक समस्यांवरील लेख विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक दैनिकांमध्ये नियमितपणे प्रकाशित होत आहेत. करिअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयावरची त्यांची पोडकास्ट आणि जाहिर व्याख्याने बहुचर्चित आहेत.
३. आभा चौबळ: वर्क अवे या पद्धतीने जगभर एकल भटकंती करणार्या आभा चौबळ यांनी ग्रीस, जर्मनी, बोस्निया, स्पेन, फ्रांस, युके अशा कित्येक देशांत काम करून प्रवासाचा हा विलक्षण अनुभव घेतला आहे. फोटोग्राफीमध्ये स्वत:च्या नावाचा एक व्यावसायिक ब्रॅंड बनविलेल्या आभाने भारतभरातील वेगवेगळ्या संस्कृतीचे विवाहविधी कॅमेराबद्ध केले आहेत. जर्मन भाषेत जिद्दीने प्रावीण्य प्राप्त करून सवडीनुसार जर्मन शिकविण्याचे कामही ती करत असते. मात्र व्यावसायिक काम आणि सोलो ट्रॅवलिंग हा छंद यातलं संतुलन ती कसोशीने आणि निग्रहपूर्वक पाळते. सोलो ट्रॅवलिंग करताना युरोपातल्या कुठल्यातरी दूरवरच्या खेड्यात घेतलेले विलक्षण अनुभवांविषयी आभा आपल्याशी बोलत असते तेव्हा तिच्या त्या गप्पांमध्ये आपणही समृद्ध होत जातो.
४. अरविंद जगताप:- झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रम "चला हवा येऊ द्या" मधील पोस्टमन काकांच्या हृदयस्पर्शी पत्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ते पोहोचलेले अरविंद जगताप हे प्रतिथयश कवी, गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. पत्रास कारण की", "गोष्ट छोटी डोंगरा एवढी" व "सेल्फी" ही विशेषतः तरुणांमध्ये त्यांची काही गाजलेली पुस्तकं. “डॅम्बीस”, “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा”, “गोष्ट छोटी डोंगरा एवढी” अशा अनेक मराठी चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहेत. "कोणता झेंडा घेऊ हाती", "पत्रास कारण की", "देव चोरला" यांसह अनेक सुप्रसिद्ध चित्रपट गीतांचे ते गीतकार आहेत.
५. डिझाईन जत्रा: डिझाईन जत्रा ही एक सामाजिक-स्थापत्य संस्था आहे. वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, वास्तुविशारद प्रतीक धनमेर आणि वास्तुविशारद शार्दुल पाटील यांची “डिझाईन जत्रा पारंपारिक वास्तुकलेपासून प्रेरणा घेऊन आजच्या गरजांनुसार वास्तूंचे डिझाईन्स करतात. स्थानिक समुदायांचा सहभागाचा आणि स्थानिक संदर्भांना अधिक प्रतिसाद देणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर बांधकामात करून ही मंडळी स्थापत्य कलेचा आगळा आविष्कार साकारतात. शहरी-ग्रामीण संवाद सुलभ करणे आणि नैसर्गिक वास्तुकलेद्वारे लोकांना मदत करणे हे देखील त्यांचे एक उद्दिष्ट आहे.
वेध-अलिबागच्या निमित्ताने एक नवे वैचारिक दालन अलिबागमधील तरुण पिढीसाठी खुले होत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य प्रायोजक म्हणून आरसीएफ लिमिटेडचे सर्वतोपरी सहाय्य लाभले आहे. आयुष्यची दिशा ठरविण्यासाठी प्रेरणा देणार्या, मार्गदर्शन करणार्या या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यासान एज्युकेशनल फाऊंडेशन, अलिबागतर्फे करण्यात येत आहे. कार्यक्रमातील सहभागासाठी : ८६९८७९५७९६ (उमेश वाळंज) किंवा ९८५०९६५४५२ (अनिल आगाशे) यांच्याशी संपर्क साधावा.