Kolhapur crime : घरफोडीप्रकरणी चौघांना अटक

Maharashtra WebNews
0

 



कोल्हापूर ( शेखर धोंगडे) : कोल्हापूरमध्ये घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे या घटनांना आळा घालण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. सदर तपास पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईत चार घरफोडी चोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून एकूण ५,६०,२८७ असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


 गुरु पोळ याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने काही दिवसांपूर्वी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले होते. घरफोडीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी कात्यायनी मंदीर परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांनी कात्यायनी मंदीराजवळ सापळा रचून गुरुदत्त शांतीनाथ पोळ (४३), हरीश मधुकर पोळ (३८), संजय मधुकर पोळ (४७) आणि स्वप्निल सुरेश सातपुते (३९) यांना ताब्यात घेतले. 




याप्रकरणी चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून सोन्या- चांदीचे दागिने तसेच घरफोडी करण्यासाठी वापरलेली हत्यारे आढळून आली. दागिने व हत्यारांबाबत तपास केला असता त्यांनी दोन घरफोडी चोरीची कबुली दिली. त्याचबरोबर आरोपींकडून ३२.५६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १८६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली, हत्यारे व इतर साहित्य असा एकूण ५,६०,२८७ असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


याप्रकरणी अधिक चौकशी केली असता गुरुनाथ पौळ याच्या विरुद्ध ५० गुन्हे दाखल असून स्वप्निल सातपुते याच्या विरुद्ध देखील २२ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. नमूद आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)