अलिबाग ( धनंजय कवठेकर ): फिल्ड आर्चरी ओसोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे फिल्ड आर्चरी ओसोसिएशन ऑफ रायगड यांच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या महाराष्ट्र राज्य फिल्ड इनडोअरधनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील चौदा धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. निवड झालेले सर्व धनुर्धर लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
अलिबाग नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर या दोन दिवसात देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या धनुर्धरांचे अचूक वेध पाहण्यास मिळाले. त्यांच्या धनुष्यातून सुटलेला प्रत्येक बाण त्यांना विजयाच्या समीप नेणारा ठरला. एकास एक सर्रास कामगिरी करणारे धनुर्धर जवळून पाहण्याचा अनुभव रायगडकरांना आला. शिस्तबद्धता, एकाग्रता आणि संयम याचे समीकरण असणारी हि स्पर्धा रायगडकरांसाठी पर्वणी ठरली. स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ दत्ताजीराव खानविलकर ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांच्या हस्ते संपन्न झाला.
रायगड जिल्ह्यातील चौदा धनुर्धरांची निवड राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. यामध्ये दहा वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये रुधीरा जाधव, स्वाहा कदम, क्षितिका कदम, मुलांमध्ये अर्जुन म्हात्रे,आणि अभिमन्यू मिश्रा या पाच धनुर्धरांनी आपले कौशल्य शुद्ध करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले तिकीट पक्के केले आहे. १४ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये तनिषा वर्तक, मुग्धा वैद्य, सई पिळणकर तर मुलांमध्ये आशय आंग्रे, दिव्यनिल दत्ता, अंश पराडकर, आरव हुलवान आणि अथर्व पाटील या धनुर्धरांनी प्रतिस्पर्ध्यांना मत देत पदकाला गवसणी घातली. हे धनुर्धर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. वरिष्ठ वयोगटात लाभेश तेली या धनुर्धराने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर पाळ्या अचूक नेमबाजीने मात केली. यामुळे लाभेश तेली यांची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या धनुर्धरांना फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम चव्हाण, फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सुभाषचंद्र नायर, फिल्ड आर्चरी असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष रितिका नायर, फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ रायगडचे सचिव संतोष जाधव, मिलिंद पांचाळ, वैभव सागवेकर, अजिंक्य अडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.