Syria crisis : सीरियातील भारतीय नागरिक सुरक्षित


सीरिया :  इस्लामी बंडखोर गटांनी दमास्कसवर कब्जा केल्याने सीरियातील बशर अल-असाद यांचे सरकार पडले आहे. दरम्यान, सीरियात राहणारे भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे भारत सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूतावास दमास्कसमध्ये पूर्णपणे सक्रिय असून सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी दूतावास सज्ज असल्याचेही सांगितले आहे. 


तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने सीरियातील भारतीय नागरिकांना आवाहन केले होते की, ज्यांना येथून बाहेर पडायचे आहे त्यांनी उपलब्ध व्यावसायिक फ्लाइटच्या मदतीने लवकरात लवकर बाहेर पडावे. त्याचवेळी, इतरांना विनंती करण्यात आली होती की तेथे राहणाऱ्या भारतीयांनी त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी आणि अनावश्यक हालचाली टाळाव्यात. मंत्रालयाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +963 993385973 देखील जारी केला आहे.


अधिकृत आकडेवारीनुसार, सीरियामध्ये सुमारे ९० भारतीय नागरिक आहेत, त्यापैकी १४ नागरिक यूएनच्या विविध संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच भारतीय दूतावास दमास्कसमध्ये कार्यरत असून सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे आणि ते सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


मिळालेल्या माहितीनुसा, बशर अल-असाद देश सोडून अज्ञात स्थळी गेले असून हा त्यांच्या कुटुंबाच्या पन्नास वर्षांच्या राजवटीचा अंत असल्याचे म्हटले जात आहे. सीरिया २०११ पासून गृहयुद्धाचा सामना करत आहे. २०११ मध्ये, सीरियन गुप्तचर संस्थेने दारा शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा छळ केल्यानंतर देशभरात निदर्शने झाली, त्याचे रूपांतर गृहयुद्धात झाले. 


Tags: #Syria crisis #indian 


Post a Comment

Previous Post Next Post