Weather update : महाराष्ट्रातील काही भागात गारपीटसह पाऊस



मुंबई :  महाराष्ट्राच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागात रिमझिम पावसाची नोंद झाली तर  बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असल्याचे चित्र पहावयास मिळाले. हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळ, पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला असून असेच हवामान या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलीी आहे.


 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी गारपीटही होईल. त्यामुळे एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे गारपीट असा दुहेरी त्रास राज्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.


आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय म्हणाले, गुरुवार संध्याकाळपासून पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचबरोबर शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचे स्वरूप बदलले आहे. सध्या उत्तरेकडून वारे वाहत असून, त्यामुळे राज्यात थंडी कमी झाली असून वादळ व पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.



उत्तर भारतातून येणारे कोरडे थंड वारे आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात पावसासारखी स्थिती निर्माण झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात जोरदार वारा आणि गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post